मुख्यमंत्री कोण हा विषय गौण; योग्यवेळी निर्णय जाहीर करु – देवेंद्र फडणवीस

0
319

मुंबई, दि. २० (पीसीबी) – आम्हाला सत्ता खुर्ची, पदांकरीता नको आहे. मंत्री कोण? मुख्यमंत्री कोण ? या चर्चा मीडियाला करु द्या. मुख्यमंत्री कोण हा विषय आमच्यासाठी गौण आहे. आम्ही सर्व काही ठरवले आहे. योग्यवेळी योग्य निर्णय सांगू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेच्या ५३ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलताना म्हणाले. माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

लोकसभेप्रमाणे ऑक्टोंबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा युती अभूतपूर्व विजय मिळवेल असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. शिवसेना-भाजपा युती वाघ-सिंहाची जोडी असून वाघ-सिंह एकत्र येतात तेव्हा जंगलात कोणाचे राज्य येणार हे सांगावे लागत नाही. वाघ-सिंह एकत्र आल्यावर जनता कोणाला कौल देणार हे स्पष्ट होते असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

शिवसेनेच्या मेळाव्याला जातो तेव्हा माझ्या घरी येतोय असे मला वाटते. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद आणि शिवसैनिकांची ऊर्जा घेण्यासाठी कार्यक्रमाला आलो आहे. माझे मोठे बंधु उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला समर्थ नेतृत्व दिले आहे अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंचे कौतुक केले.

भगव्या ध्वजासाठी लढणारे, व्यापक हिंदुत्वासाठी आपण एकत्र आलो आहोत. आमचं हिंदुत्व संकुचित नाही ते राष्ट्रीयत्व आहे. हिंदुस्थान, महाराष्ट्राच्या भल्यासाठी एकत्र आलो आहोत असे फडणवीस म्हणाले. आपल्याला महाराष्ट्रात दुष्काळाला भूतकाळ बनवायचे आहे. महाराष्ट्राला सुजलाम, सुफलाम करण्यासाठी प्रचंड बहुमतांनी विजय मिळवण्याचे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले.