Pune

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली महापौर मुरली मोहळ यांची विचारपूस

By PCB Author

July 08, 2020

पुणे, दि. ८ (पीसीबी) : कोरोनाची लागण झालेले पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन करून प्रकृतीची विचारपूस केली. काळजी घेऊन लवकर बरं होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या. फील्डवर काम करत असल्याबद्दल कौतुक केलं. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह कुटुंबातील नऊ जणांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शिवसेना आणि भाजपमध्ये मतभेद असले, तरी कोरोनाच्या संकटकाळात राजकीय चेहऱ्यापलिकडे असलेल्या माणुसकीचे दर्शन मुख्यमंत्र्यांनी घडवल्याचे बोलले जात आहे. भाजपचे नगरसेवक असलेले मोहोळ थेट मुख्यमंत्र्यांच्या फोनमुळे हरखून गेले. मुरलीधर मोहोळ यांना ताप आल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. शनिवारी (4 जुलै) सायंकाळी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. शहराचे प्रथम नागरिक या नात्याने महापौरांनी वेगवेगळ्या बैठकांना हजेरी लावली होती. पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने महापौरांवर मोठी जबाबदारी आहे.

राज्यातील मंत्री, आमदारांना कोरोनाची लागण गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मग सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि त्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची बाधा झाली होती. या सर्वांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. लातूरमधील औसाचे भाजप आमदार अभिमन्यू पवार, पुण्यातील दौंडचे भाजप आमदार राहुल कुल, पिंपरी चिंचवडचे भाजप आमदार महेश लांडगे आणि त्यांची पत्नी, हडपसरमधील भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर, मिरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन, नाशिकमधील राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह कुटुंबातील नऊ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर माजी महापौर आणि विद्यमान भाजप आमदार मुक्ता टिळक आणि त्यांच्या मातोश्री यांनाही कोरोना झाला आहे. याशिवाय नांदेडच्याही एका आमदाराला कोरोना झाला होता. अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेसच्या विद्यमान आमदाराला कोरोनाची लागण झाली आहे.