Others

मुख्यमंत्री ‘उद्धव ठाकरे’ यांच्याविरोधात वादग्रस्त विधान राणेंना भोवणार ?

By PCB Author

August 24, 2021

चिपळूण, दि. 24 (पीसीबी): केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केलं आहे. त्याचे तीव्र पडसाद उमटले असून शिवसैनिक आणि युवा सेनेचे नेते रस्त्यावर उतरले आहेत. तसेच दुसरीकडे गुन्हे दाखल झाल्याने राणे यांना केव्हाही अटक होण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याचं मला माहीत नाही. तुम्ही म्हणताय म्हणून मी मान्य करणार नाही. तुम्ही माहिती घ्या, असं सांगतानाच मी जे काही बोललो तो क्रिमिनल ऑफेन्स नाही, असं नारायण राणे म्हणाले.

नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही प्रतिक्रिया व्यक्त केली. पत्रकार परिषद घेण्यापूर्वी नारायण राणे यांनी त्यांचे वकील अॅड. संजय चिठणील यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. मला तुम्हाला सांगायचं आहे, माहिती अभावी मी एकही उत्तर देणार नाही. माझ्यावर गुन्हा दाखल झालाय याची माहिती मला नाही. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. तुम्ही तपासून पाहा, मग आपआपल्या टीव्हीवर दाखवा, नायतर तुमच्याविरोधात माझी केस दाखल होईल. गुन्हा दाखल नसताना, उगाच अटक होणार वगैरे काय नॉर्मल माणूस वाटलो काय तुम्हाला?, असा सवाल राणे यांनी केला. राणे नेमंक काय म्हणाले होते? राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे. रायगडच्या महाडमध्ये पत्रकारांशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यावेळी त्यांनी हिरक महोत्सव हा शब्द वापरला. मात्र, तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचं सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. “आज 74 वर्षे पूर्ण करुन 75 व्या वर्षात अमृत महोत्सवी… नाही हिरक महोत्सवी… अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करतो आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावरुन राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला होता.