Maharashtra

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ७ मार्चला जाणार अयोध्येला!

By PCB Author

February 23, 2020

मुंबई,दि.२३(पीसीबी) – महाविकास आघाडी सरकारला १०० दिवसपूर्ती होत असून त्यानिमित्ताने मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्येला जाणार आहेत. तसेच अयोध्येमध्ये शक्तीप्रदर्शन सुद्धा करणार आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये हिंदुत्वाच्या मुद्दय़ावरून शिवसेनेची कोंडी होत आहे. निवडणुका झाल्यावर अयोध्येला जाण्याचे ठाकरे यांनी जाहीर केले होते. सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेनेने हिंदूुत्वाची भूमिका मवाळ केल्याची चर्चा सुरू झाली होती.

मुख्यमंत्री सात मार्चला दुपारी अयोध्येत श्रीरामांचे दर्शन घेतील व सायंकाळी शरयूतीरी आरती करतील, असे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी सांगितले. त्यांच्यासमवेत शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार, नेते व अनेक कार्यकर्ते अयोध्येला जाणार आहेत.

दरम्यान, लोकसभा व विधानसभा निवडणुकीदरम्यान शिवसेनेने भाजपची कोंडी करण्यासाठी अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा लावून धरला होता. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यावर राम मंदिराचा प्रश्न सुटला आहे.