मुख्यमंत्रीपदावरून नाशिकमध्ये युतीत पोस्टरवॉर

0
397

नाशिक , दि, १६ (पीसीबी) – राज्यात मुख्यमंत्री कोणाचा या विषयावरून शिवसेना आणि भाजपच्या वरीष्ठ नेत्यांमध्ये वर्चस्ववादाचे शाब्दिक युद्ध सुरू असतांनाच नाशिकमध्ये शिवसेनेच्या नगरसेविका किरण गामणे यांनी भाजप कार्यालयासमोरच ‘मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार’ असा दावा करणारे पोस्टर्स लावून भाजपलाच आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे.

गामणे यांनी लावलेल्या पोस्टर्समुळे युतीमध्ये खळबळ उडाली असून दोन्ही पक्षातील नेत्यांची कोंडी वाढली आहे. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी याबाबत कानावर हात ठेवले असून संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी या प्रकरणाची माहिती मागवली आहे. दरम्यान भाजपने युती तोडण्याचे हे षडयंत्र असल्याचे सांगत, अशा लोकांपासून सावध रहावे असे आवाहन सेना नेत्यांना केले आहे.