मुख्यमंत्रीपदाचा तात्पुरता कारभार कोण सांभाळणार? ‘या’ दोन नावांची जोरात चर्चा सुरु

0
968

मुंबई, दि.२४ (पीसीबी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गेल्या आठ दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या पाठीच्या मणक्याची शस्त्रक्रिया करण्यात आल्याने ते उपचार घेत आहेत. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतरही त्यांना काही दिवस आराम करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा तात्पुरता पदभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जाणार की नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंकडे दिला जाणार याबाबतची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीच्या मणक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या ते रिलायन्स हॉस्पिटलमध्ये फिजिओथेरपीचे उपचार घेत आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच त्यांना डिस्चार्ज मिळणार असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयातून स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र, त्यांना डिस्चार्ज कधी मिळेल त्याबाबतची नेमकी माहिती देण्यात आली नाही. मुख्यमंत्र्यांना डिस्चार्ज दिल्यानंतरही त्यांना किमान दोन महिने आराम करावा लागणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा भार कुणाकडे जाणार याबाबतची सोशल मीडियात चर्चा सुरू झाली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा भार दिला जाऊ शकतो अशी चर्चा आहे. सोशल मीडियातही तसे मेसेज व्हायरल होत आहेत. मुख्यमंत्र्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे देण्यात आल्याचे मेसेज व्हायर होत होते. त्यावेळी स्वत: शिंदे यांनी आपल्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे देण्यात आलेली नाहीत. मुख्यमंत्री एकदोन दिवसातच रुग्णालयातून घरी येतील असं म्हटलं होतं. मुख्यमंत्र्यांवर शस्त्रक्रिया झाली असून त्यांची तब्येत झपाट्याने सुधारत आहे. त्यामुळे ते लवकरच बरे होऊन घरी येतील असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. उद्धव ठाकरे यांना डॉक्टरांनी काही सल्ला दिला आहे. त्या सल्ल्यांचं ते पालन करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

सोशल मीडियावर चुकीचा मेसेज व्हायरल झाल्यानंतर स्वत: एकनाथ शिंदे यांनी निवेदन काढून स्पष्टीकरण दिलं होतं. मुख्यमंत्रिपदाचा तात्पुरता कार्यभार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे वृत्त सोशल मीडियावरून व्हायरल होत असून त्यात कुठलेही तथ्य नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्यावर एक छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात येणार असून, त्यानंतर अवघे तीन ते चार दिवस आराम केल्यानंतर ते पुन्हा जनतेच्या सेवेत रुजू होतील. आई जगदंबेचा कृपाशीर्वाद आणि तमाम जनतेच्या सदिच्छा उद्धव ठाकरे साहेबांसोबत आहेत. त्यामुळे समाजमाध्यमावर फिरणाऱ्या खोट्या आणि खोडसाळ मेसेजस आणि पोस्टवर विश्वास ठेवू नये, ही नम्र विनंती, असं शिंदे यांनी स्पष्ट केलं होतं.