Desh

मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेसमध्ये वादावादी; कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

By PCB Author

December 13, 2018

नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी) –  राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी कोणाची वर्णी लावावी, याबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निवासस्थानी खल सुरू आहे. तर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. राहुल गांधी यांच्या निवासस्थानी प्रियंका गांधी पोहचल्या आहेत तसेच सोनिया गांधीही या ठिकाणी दाखल झाल्या आहेत.  राजस्थानमध्ये मुख्यमंत्री म्हणून अशोक गहलोत यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते, तर मध्यप्रदेशात कमलनाथ यांचे नांव  मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित केल्याचे सांगितले जात आहे.  

या दोन्ही निर्णयांमुळे सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य सिंधिया नाराज असल्याचे समजते.  त्यामुळेच या दोघांचे समर्थक विरूद्ध इतर काँग्रेस कार्यकर्ते यांच्यात वाद सुरु झाला आहे. आता या वादावर कसा तोडगा काढायचा याबाबत काँग्रेससमोर प्रश्न उभा राहिला आहे.

कमलनाथ यांचे नाव निश्चित झाल्याने मध्यप्रदेशात ज्योतिरादित्य सिंधिया कार्यकर्ते नाराज झाले आहेत.  सिंधिया यांना मुख्यमंत्रीपद मिळावे म्हणून कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राजस्थानातही सचिन पायलट यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी सुरु केली आहे. मध्यप्रदेश आणि राजस्थान येथे  काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये  अंतर्गत बंडाळी समोर आली आहे.