Maharashtra

‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’; मुंबई जिंकण्यासाठी शिवसेनेची गुजराती मतदारांना साद

By PCB Author

January 05, 2021

मुंबई, दि.५ (पीसीबी) : भाजपकडून निर्माण झालेल्या तगड्या आव्हानामुळे आता शिवसेना मुंबई महानगरपालिकान जिंकण्यासाठी कामाला लागली आहे. त्यासाठी शिवसेनेने फक्त मराठी मतदारांवर अवलंबून न राहता मुंबईच्या कॉस्मोपॉलिटीन मतदारांना साद घालायचे ठरवले आहे. याचाच एक भाग म्हणून आता शिवसेनेकडून मुंबईसह राज्यातील गुजरात मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत.

फेब्रुवारी महिन्यात राज्यातील 10 महानगरपालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या सगळ्यात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. मुंबई महानगरपालिका हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे यावेळी शिवसेनेने मुंबई राखण्यासाठी गुजराती मतदारांना जागृत करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे.

त्यासाठी शिवसेना गुजराती बांधवांचा मेळावा आयोजित करणार आहे. या मेळाव्यासाठी ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ अशी टॅगलाईन वापरली जात आहे. शिवसेना संघटक हेमराज शाह यांच्यावर गुजराती मतदारांना सेनेकडे वळवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

या मेळाव्यासाठी गुजराती आणि मराठी भाषेत निमंत्रणं छापण्यात आली आहेत. येत्या 10 तारखेला जोगेश्वरीत हा मेळावा होणार आहे. यावेळी तब्बल 100 गुजराती बांधव शिवसेनेत जाहीर प्रवेश करतील, असे सांगितले जात आहे. त्यामुळे आता शिवसेनेची भाजपच्या पारंपरिक मतदारांना आकर्षित करण्याची ही खेळी कितपत यशस्वी ठरणार, हे येणारा काळच ठरवेल.