मुंबई बॉम्ब स्फोटप्रकरणातील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू

0
628

नागपुर, दि. ११ (पीसीबी) – मुंबईत २००३ मध्ये झालेल्या भीषण बॉम्ब स्फोटप्रकरणातील फाशीची शिक्षा सुनावलेल्या आरोपीचा शनिवारी रात्रीच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मोहम्मद हानिफ सईद असे या आरोपीचे नाव आहे. तो नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता.

हानिफ त्याची पत्नी फेहमिदा आणि अशरत अन्सारी या तिघांनी मिळून दोन टॅक्सीमध्ये शक्तीशाली बॉम्ब स्फोट घडवून आणण्याचा कट रचला होता. त्यानुसार, २५ ऑगस्ट २००३मध्ये ऐतिहासिक ‘गेट वे ऑफ इंडिया’ आणि ‘झवेरी बझार’ येथे हे स्फोट झाले होते. यामध्ये ५२ जणांचा मृत्यू झाला होता तर २४४ जण जखमी झाले होते.

सईदच्या मृत्यूबाबत माहिती देताना कारागृहाचे अधीक्षक राणी भोसले यांनी सांगितले की, शनिवारी अचानक त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला नागपूरच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात तातडीने त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले मात्र, दीड तासांच्या अवधीतच त्याचा मृत्यू झाला. या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र, शवविच्छेदन अहवालानंतरच ते समोर येईल. सोमवारी सईदच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत त्याचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. दरम्यान, ऑटोस्पाय झाल्यानंतर हानिफचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात सोपवण्यात येणार आहे.