Maharashtra

मुंबई पूल दुर्घटना: … तर माझा भाऊ वाचला असता!

By PCB Author

March 15, 2019

मुंबई, दि. १५ (पीसीबी)- मुंबईत एखादी दुर्घटना घडल्यानंतर कशाचीही पर्वा न करता मुंबईकर मदतीला धावून जात असतो. काल सीएसएमटीचा हिमालय हा पादचारी पूल कोसळल्यानंतरही लोक मदतीला धावले, मात्र दुर्घटना घडल्यानंतर त्याचे मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवण्याचे प्रकारही मुंबईकरांनी अनुभवले. या दुर्घटनेचा बळी ठरलेला जाहिद खान याचा भाऊ कमाल खान या मुंबईकराने तशी तक्रार केली आहे. कमालचा भाऊ जखमी झाल्यानंतर त्याला मदत करण्याऐवजी लोक मोबाइलवर शूटिंग करत होते. लोकांनी वेळीच मदत केली असती तर आपल्या भावाचे प्राण वाचले असते, अशी तक्रार कमाल खान याने केली आहे.

घाटकोपरचा रहिवासी असलेला जाहिद खान याचे पट्ट्याचे दुकान होते. जाहिद आपल्या वडिलांसोबत त्यांच्या दुकानासाठी सामान खरेदीसाठी क्रॉफर्ड मार्केटमध्ये जात होता. सीएसएमटी स्टेशनवर उतरल्यानंतर ते दोघे हिमालय पादचारी पुलावरून पलिकडे जात होते. त्यावेळी हा पूल कोसळला. यात जाहिदचे वडील जखमी झाले. जाहिद मात्र गंभीर जखमी झाला. जाहिदच्या वडिलांना जाहिदला उचलून हॉस्पिटलमध्ये हलवले. घटना घडल्यानंतर माझे काका लोकांकडे मदत मागत होते. मात्र कुणी मदतीला आलेच नाहीत. आसपासचे लोक मोबाइलमध्ये व्हिडिओ बनवण्यात व्यस्त होते. व्हिडिओ बनवणाऱ्यांपैकी जर कुणी मदतीला आले असते, तर माझ्या भावाचे प्राण नक्कीच वाचले असते असे कमाल म्हणाला.

काल (गुरुवार) संध्याकाळी साडे सातच्या सुमाराला सीएसएमटीचा हिमालय हा पूल कोसळला. यात ६ नागरिकांचे बळी गेले असून ३४ जण जखमी झाले आहेत.