Banner News

मुंबई-पुणे रेल्वे सेवा पूर्ववत; आजपासून रेल्वे पुन्हा धावणार   

By PCB Author

August 16, 2019

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्याने  ठप्प झालेली मुंबई-पुणे रेल्वे सेवा आजपासून (शुक्रवार) पुन्हा सुरू  झाली आहे.  रेल्वे वाहतूक बंद असल्याने गेली १५ ते २० दिवसांपासून प्रवाशांचा खोळंबा झाला होता. वाहतूक पूर्ववत झाल्याने अखेर  प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जुलै महिन्याच्या अखेरीस झालेल्या  अतिवृष्टीमुळे  मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर दरडी कोसळल्या होत्या.   दरडी हटविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने  २६ जुलै ते ९ ऑगस्ट असा मेगाब्लॉक घेतला होता. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पुन्हा जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी रूळ पाण्याखाली गेले. रुळांखालची खडी वाहून गेली. सिग्नल यंत्रणा ठप्प झाली. यामुळे हा पूर्ण मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.

सिंहगड एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन, इंटरसिटी एक्स्प्रेस व इंद्रायणी एक्स्प्रेस या गाड्या आजपासून नियोजित वेळापत्रकानुसार धावणार आहेत, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने  दिली आहे.