मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर किमान ८० किमी प्रतितास वेगमर्यादा बंधनकारक

0
611

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाढत्या अपघातांच्या घटना रोखण्यासाठी   ताशी ८० किमीपेक्षा कमी वेगाने गाडी चालवता येणार नाही. वाहतूक पोलिसांनी किमान ८० किमी प्रतितास ही वेगमर्यादा निश्चित केली असून अधिसुचना जारी केली आहे. द्रुतगतीवरील पहिल्या लेनमध्ये धीम्या गतीने जाणाऱ्या वाहनांमुळे मागून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांना अडथळा येतो. त्यामुळे ही वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक आर. के. पद्मनाभन यांनी दिली.

मात्र, अत्यावश्यक सेवा वाहने, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने, पोलिस आणि शासकीय वाहने यांना या नियमांतून सूट देण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. द्रुतगती मार्गावरील तीन लेनपैकी कार, जीप, टेंपो या हलक्‍या वाहनांनी मार्गाच्या मधल्या लेनमधून आणि अवजड वाहनांनी सर्व्हिस लेनला लागून असलेल्या डावीकडील लेनमधून; तर केवळ पुढील वाहनाच्या पुढे जाताना उजवीकडील लेनचा वापर करणे अपेक्षित आहे. इतर वेळी उजवीकडील लेन कायम रिकामी ठेवणे आवश्‍यक आहे.

उजवीकडील लेन एखाद्या वाहनाच्या पुढे जाण्यासाठी राखीव असल्याने पहिल्या लेनमधून प्रवास करताना आवश्‍यक असणारी गती ताशी ८० कि.मी.पेक्षा कमी असल्यास पाठीमागून येणाऱ्या वाहनचालकांना अडथळा निर्माण होऊन अपघात होतात, असे निदर्शनास आले आहे. तसेच वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी, अपघात रोखण्यासाठी; तसेच लेनच्या शिस्तीचे पालन व्हावे, यासाठी वेगाच्या बाबतीत किमान गती ठेवण्यासाठी ही अधिसूचना काढण्यात आली आहे.