मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ट्रकचा भीषण अपघात; क्लिनरचा मृत्यू

0
835

लोणावळा, दि. ११ (पीसीबी) –  ट्रक पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात क्लिनरचा जागीच मृत्यू झाला तर चालक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज (शुक्रवारी) पहाटे साडेपाचच्या सुमारास मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खालापूरजवळ घडला.

मोहम्मद सुलतान असे अपघातात मृत क्लिनरचे नाव असून चालक मोहमद मुज्जफिर (दोघेही रा. जमानगड, हरियाना) हा गंभीर जखमी झाला आहे.

महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे साडेपाचच्या सुमारास मोहमद हा त्याच्या ताब्यातील साखरेचा ट्रक भरधाव वेगात मुंबईच्या दिशेने घेऊन चालला होता. यावेळी ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रकच्या पुढे जाणाऱ्या टँकरला तो धडकला आणि रस्ता दुभाजकाला लावण्यात आलेल्या ब्रायफ्रेन रोपवर घासत जाऊन पलटी झाला. यामध्ये गाडीतील क्लिनर मोहमद सुलतान हा रस्त्यावर पडलेल्या साखरेच्या पोत्यांखाली आडकल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला तर चालक मोहमद मुज्जफिर हा गाडीतच आडकून जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच बोरघाट खोपोली पोलीस, देवदूत यंत्रणा आणि आयआरबी पथकाने चालकाला ट्रकमधून बाहेर काढून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.