Pune

मुंबई परप्रांतीयांना आंदण दिली का? – राज ठाकरे

By PCB Author

November 26, 2018

पुणे, दि. २६ (पीसीबी) – मुंबई परप्रांतीयांना आंदण दिली का? असा सवाल करून फक्त गुजराती मारवाडींच्या संस्था का उभ्या राहतात? मराठी माणसांच्या संस्था का उभ्या राहत नाहीत,  असाही प्रश्न   मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. पुण्यात आज (सोमवार) आयोजित पत्रकार परिषदेत राज ठाकरे बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्रात बाहेरच्या राज्यांमधून दररोज ४८ रेल्वे येतात.  त्यातून जे लोंढे महाराष्ट्रात आणि मुंबईत येतात ते कुठे गेले? यात गुन्हेगार कोण? पोटासाठी कोण आलंय? याचा शोध घेतला जातो का? असाही प्रश्न राज ठाकरेंनी  यावेळी उपस्थित केला. पोलीस किंवा न्यायालयाकडून येणाऱ्या कागदांमध्ये मला कधीही काहीही समजलेले नाही. मला पकडलंय की सोडलंय हे जाणून घेण्यासाठी वकिलालाच बोलावावे लागते,  अशी टिप्पणी राज ठाकरेंनी करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

शाळा आणि कॉलेज यांची आठवण यायला लागली की, आपण पन्नाशी ओलांडली असे समजावे. आता मलाही आठवण येते आहे, असेही राज ठाकरेंनी सांगितले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा परप्रांतीयांचा मुद्दा उचलून धरत राज्य सरकारवर निशाणा साधला.