मुंबई, ठाण्यात मुसळधार; शाळांना सुट्टी जाहीर

0
431

मुंबई, दि.१९ (पीसीबी) – भारतीय हवामान खात्याने मुंबई आणि रायगडमध्ये गुरूवारसाठी रेड अलर्ट जाहीर केला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई ठाण्यासह कोकणातील शाळांना आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला झोडपून काढले होते. परंतु आता पाऊस परतीच्या मार्गाला लागला आहे. कोकण आणि गोव्यात सध्या मान्सून सक्रिय असून गेल्या २४ तासांपासून राज्यभरात अनेक ठिकाणी पाऊस सुरू आहे. तसेच शनिवारपर्यंत पाऊस सक्रिय राहण्याची चिन्हे यापूर्वीच वर्तवण्यात आली होती.

भारतीय हवामान विभागाने मुंबई आणि रायगडसाठी रेड अलर्ट जारी केला होता. त्यानुसार या ठिकाण मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच पालघर आणि ठाणे जिल्ह्यातही मुसळधार पाऊस ते अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान मुंबई पोलिसांनीदेखील ट्विट करत सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याची विनंती केली आहे.

बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रातील घडामोडींतून तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण किनारपट्टी, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवसांत अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गुरुवारी मुंबई, रायगड जिल्ह्य़ात काही ठिकाणी, पुणे आणि सातारा जिल्ह्य़ांत घाटमाथ्यावर विखुरलेल्या ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईत विक्रमाची शक्यता..
मुंबईत या वर्षी संपूर्ण मोसमातील (जून ते सप्टेंबर) एकूण पावसाचे प्रमाण गेल्या सत्तर वर्षांतील सर्वाधिक नोंदीच्या जवळ पोहोचले असून पुढील दोन आठवडय़ांत हा आकडा ओलांडून मोसमातील सर्वाधिक पावसाचे नवी नोंद या वर्षी होण्याची शक्यता आहे.

१९५० ते २०१९ या काळात मोसमातील सर्वाधिक पावसाची नोंद १९५८ साली ३,७५९.७ मिमी, तर सर्वात कमी पावसाची नोंद १९८६ साली १,३४१.९ इतकी होती. या वर्षी १ जूनपासून १८ सप्टेंबपर्यंत मोसमातील एकूण पावसाची नोंद ३,४७५.२ मिमी झाली आहे. पावसाळ्याचे अजून दोन आठवडे बाकी आहेत आणि पुढील काही दिवसांत अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पाश्र्वभूमीवर यंदा १९५८ ची मोसमातील सर्वाधिक पावसाची आकडेवारी ओलांडली जाण्याची शक्यता आहे.