मुंबई आणि पुण्यात ऑनलाईन शिक्षण सुरु आहे, पण गावात काय होणार याची चिंता – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

0
583

मुंबई, दि. २९ (पीसीबी) : राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रांच्या संपादकांसोबत बैठक आयोजित केली होती. शिवाजी पार्क जवळील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या जागेत जवळपास दीड ते दोन तास ही बैठक सुरु होती. लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपल्यानंतर नेमकं काय करावे? म्हणजेच लॉकडाऊन पुढे वाढवण्यात येणार का? याबाबत केंद्र सरकार निर्णय घेईल असं मुख्यमंत्री म्हणाले. केंद्र सरकार राज्यांकडून त्यांचं मत जाणून घेत असल्याचे त्यांनी संपादकांच्या बैठकीत सांगितले.

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार करीत असलेल्या उपाययोजनांची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. तसंच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाबाबत त्यांच्या बोलण्यात जास्त चिंता व्यक्त होत होती. यावेळी काही संपादकांनी सरकारला काही सूचना केल्या.

शिक्षणाचा विषय महत्त्वाचा
मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यात शिक्षणाचा विषय हा सर्वात चिंतेचा वाटला. जर पुढील ५ ते ६ महिने असंच वातावरण राहिले तर आपल्याला काही तरी निर्णय घ्यावा लागेल. मुंबई आणि पुण्यात ऑनलाईन शिक्षण सुरु आहे, पण गावात काय होणार ही चिंता त्यांच्या बोलण्यात जाणवली. जर हे लांबलं तर त्या काळात काय करावं हे त्यांनी सांगितले.

शिक्षणाच्या मुद्द्यामुळे ते चिंतेत वाटले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये. मुंबई-पुण्यात ऑनलाईन शिक्षण होऊ शकतं, पण इतर गावाकडील शिक्षणाचं काय? त्यांचे हे वर्ष वाया जाऊ नये. त्याबद्दल सरकार नक्कीच एक प्लॅन वगैरे घेऊन येईल, हे मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यातून जाणवत होतं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनबाबत सांगितलं. दोन दिवसानंतर ३१ मे आहे, याबाबतच केंद्र सरकार सर्वांचे मत जाणून घेत आहे. गेले दोन दिवस बैठका सुरु आहे. येत्या दोन दिवसात केंद्रातून याबाबत काहीतरी निर्देश येतील आणि त्यानुसार ३१ मे नंतर परिस्थिती कशी असेल, हे स्पष्ट होईल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यावर जास्त काही भाष्य केलेलं नाही.

मुख्यमंत्र्यांच्या मते, आम्ही सर्व केंद्राच्या निर्देशाची वाट पाहत आहोत. सर्व राज्याचे प्रतिनिधी, प्रधान सचिव हे चर्चा करत आहे. त्यावरुन केंद्र सरकार काय निर्णय घेतं हे पाहावं लागेल. तसेच केंद्र सरकार काय निर्णय घेतं त्यांच्या गाईडलाईन्स काय येतात, याची सरकारला प्रतीक्षा आहे. त्यानुसार ३१ मे नंतरच्या निर्णयासाठी सध्या तरी राज्य सरकार केंद्र सरकारवर विसंबून असल्याचे दिसत आहे.

वेगवेगळे तज्ज्ञ वेगवेगळ्या गोष्टी सांगत आहेत. काही जणांकडून पाच ते सहा महिने तर WHO ने पुढील वर्षही असचं जाऊ शकतं असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे सरकारला अशा परिस्थितीत काय केलं पाहिजे हे जाणून घ्यायचं होतं. कारण चार लॉकडाऊन झाले आहेत. लोकांमध्ये उद्रेक आहे. लोकांना कुठे तरी सूट हवी आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

मुंबई आणि महाराष्ट्राची स्थिती कंट्रोलमध्ये
दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सध्या महाराष्ट्राची किंवा मुंबईची स्थिती कंट्रोलमध्ये आहे. पण जर लॉकडाऊन उठवला तर संसर्ग वाढू शकतो. ज्या प्रकारे दिल्लीत लॉकडाऊन उठवला होता आणि नंतर रुग्ण वाढू लागले, तसं महाराष्ट्रात होऊ शकतो, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

ICMR च्या गाईडलाईन्सनुसार रुग्णसंख्या फार मोठी दिसते आहे. कारण पहिल्या दिवसापासून आतापर्यंत रुग्णसंख्या दिसत आहे. पण त्यात बरेच जण डिस्चार्ज होऊनही जात आहेत. त्यामुळे ICMR च्या काही गाईडलाईन्स जर बदलल्या तर लोकांना कळेल की एवढे रुग्ण नाहीत. म्हणजेच जेव्हा ३६ हजार रुग्ण असतात तेव्हा सद्यस्थितीत फक्त १२ ते १३ हजार रुग्ण उपचार घेत असतात. बाकी क्वारंटाईन किंवा लक्षणे नसलेले आहेत. त्यामुळे अॅक्टिव्ह रुग्ण फार कमी आहेत.