Maharashtra

मुंबईमध्ये शिवसेना-मनसेमध्ये फलकयुध्द; मनसेच्या पोस्टरबाजीला शिवसेनेचे प्रत्युत्तर

By PCB Author

October 20, 2018

मुंबई, दि. २० (पीसीबी) – मुंबई, दादरमध्ये शिवसेना आणि मनसेमध्ये फलकयुध्द सुरू झाले आहे. शिवसेना दसरा मेळाव्यानंतर मनसेने शिवसेना भवनासमोर पोस्टरबाजी केली होती. मनसेच्या या पोस्टरबाजीला शिवसेनेने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

फलकाच्या माध्यमातून शिवसेनेने मनसेवर हल्ला चढवला आहे. शिवसेनेने मनसेने केलेल्या टोल आंदोलन, रेल्वे भरती परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांसाठीचे आंदोलने, पाकिस्तानी कलाकारांविरोधातील आंदोलन यावर टीका करत थेट राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकांवर हल्लाबोल केला.

सेंटींगवाले टोल आंदोलन, विद्यार्थ्यांनी फसवलेले रेल्वे आंदोलन, पाक कलाकार विरोधाच्या नावे खुले आम सेटिंग, राहत्या वॉर्डात निवडून यायचे वांदे आणि जगाला सल्ले द्यायचे यांचे धंदे अशा शब्दांत शिवसेने मनसेला उत्तर दिले आहे.

दरम्यान, येत्या २५ नोव्हेंबरला अयोध्येत जाणार असल्याचे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात जाहीर केले आहे.  या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या मनसेने शिवसेनेला अयोध्या वारीसाठी शुभेच्छा देत राज्यातील काही गंभीर प्रश्नाबाबत काय?  असा प्रश्न पोस्टरद्वारे  केला आहे.