मुंबईत शिवसेना आमदार तुकाराम कातेंवर जीवघेणा हल्ला

0
779

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – शिवसेना आमदार तुकाराम काते यांच्यावर शुक्रवारी (दि. १२) जीवघेणा हल्ला झाला. मानखुर्दमधील महाराष्ट्रनगर परिसरात रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. हल्ल्यात तुकाराम कातेंच्या सुरक्षारक्षकासह २ कार्यकर्ते जखमी झालेत. मात्र सुदैवाने आमदार तुकाराम काते थोडक्यात बचावले.

मिळालेल्या माहितीनुसार, तुकाराम काते हे शिवसेनेचे मुंबईतील आमदार आहेत. मुंबईतील अणुशक्तीनगर मतदारसंघातून काते विधानसभेत निवडून गेले आहेत.  महाराष्ट्र नगर भागात मेट्रो कारशेड तयार करण्याचे काम रात्रंदिवस सुरु असल्याने याचा तेथील स्थानिकांना त्रास होत आहे. हे काम  तात्काळ थांबवावे, या मागणीसाठी त्यांनी दोन दिवसापूर्वी शिवसेनेच्या वतीने आंदोलन केले होते.

काल (शुक्रवारी) रात्री महाराष्ट्र नगरमधील देवीच्या मंडपात बसले होते. यावेळी त्यांच्यावर ५ ते ६जणांनी जीवघेणा हल्ला केला. मेट्रोच्या कंत्राटदारांनी हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप तुकाराम कातेंनी केला आहे. पोलिस तपास करत आहेत.