Maharashtra

मुंबईत महिला पोलीसाचा विनयभंग करुन सहकारी पोलीसाला मारहाण

By PCB Author

January 20, 2019

मुंबई, दि. २० (पीसीबी) – वाहन थांबवून तपासणी केल्याच्या रागातून एका टॅक्सी चालकाने त्याच्या साथीदारांसह मिळून महिला वाहतुक पोलीसाचा विनयभंग केला. तसेच त्यांच्यासोबत असलेल्या एका पोलीस शिपायाला जबर मारहाण केली. ही धक्कादायक घटना मुंबईतील माहिम येथील पॅराडाईज सिनेमा गृहाजवळ घडली.

ज्ञानेश्वर मेश्राम असे जखमी पोलीस शिपायाचे नाव आहे. याप्रकरणी माहिम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार, आरोपी इब्राहिम अल्लाबक्ष शेख, असिफ खुदूस शेख, शहाबाद शमशाद खान, मदस्सर उर्फ अफसर मुस्तकिन शेख आणि बुऱ्हाउद्दीन उर्फ बुऱ्हान मुशीउद्दीन शेख या पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार (दि.१४) जानेवारीला वाहतूक विभागाचे पोलीस शिपाई ज्ञानेश्वर मेश्राम आणि महिला पोलीस शिपाई पॅराडाईज सिनेमा गृहाजवळ कर्तव्य बजावत असताना संध्याकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास एक टॅक्सी वांद्रेच्या दिशेने जात होती. तिला थांबवून चौकशी करताना आरोपी इब्राहिम शेख याच्याशी मेश्राम यांची हुज्जत झाली. शाब्दिक चकमकीनंतर शेख हा अन्य चार साथीदारांच्या सोबत आला आणि मेश्राम यांना भररस्त्यात शिवीगाळी आणि महिला शिपायाचा विनयभंग केला. सदर प्रकाराची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास चव्हाण यांना मिळताच ते पोलिसांसह घटनास्थळी पोहोचले. माहीम पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात सरकारी कामात अडथळा, शिवीगाळ, विनयभंग अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि काही तासांतच टॅक्सी चालक इब्राहिम शेख याला अटक केली. त्याच्या चौकशीत पोबारा करणाऱ्या अन्य चार आरोपींची नावे घेऊन पोलिसांनी चौघांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. माहिम पोलीस अधिक तपास करत आहेत.