Maharashtra

मुंबईत टाइम्स नाउच्या पत्रकारासह मित्रावर जीवघेणा हल्ला

By PCB Author

October 15, 2018

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – टाइम्स नाउ या इंग्रजी वृत्त वाहिनीच्या पत्रकारासह त्याच्या मित्रावर ४ समाजकटकांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रविवार (दि.१४) पहाटे दिडच्या सुमारास गामादेवी पोलीस ठाण्याजवळ घडली. घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले आहे.

हरमन गोमस असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पत्रकाराचे नाव आहे. याप्रकरणी अज्ञात हल्लेखोरांविरोधात गामादेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हरमन गोमस यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर माझ्या घराजवळ आमची वाट पहात उभे होते. कोणत्याही प्रकारचा वाद झालेला नव्हता. आम्ही आल्यावर त्यांनी अचानक आमच्यावर हल्ला चढवला. ते एकूण ४ जण होते. मारहाण केल्यानंतर त्यांनी मित्राचा मोबाईलही हिसकावून नेल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली असून तपास सुरू आहे. हल्लेखोरांची ओळख अद्याप पटलेली नाही. या हल्ल्यात पत्रकाराच्या डोळ्याला गंभीर इजा झाली आहे. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडली का किंवा लुटमार करण्याच्या उद्देशाने मारहाण करण्यात आली हे दोन्ही मुद्दे समोर ठेवून पोलीस तपास करत आहेत.