मुंबईत घरांची विक्री ‘सातवे आसमान’ पर; डिसेंबरमध्ये झाली चक्क 18 हजार घरांची विक्री

0
183

मुंबई, दि.०१ (पीसीबी) : कोरोनामुळे खाली आलेल्या रिअल इस्टेट क्षेत्राला डिसेंबर महिना जणू नवसंजीवनी घेऊन आला आहे. कारण मुंबईतील कोरोनामुळे घटलेल्या घरांच्या मागणीत डिसेंबर महिन्यात तब्बल 103% नी मागणी वाढल्याची माहिती समोर आली आहे. एका सर्व्हेनुसार तब्बल 18 हजार 854 घरांची विक्री मुंबईत यंदा डिसेंबर महिन्यात करण्यात आलेली आहे. आणि अखेरच्या तीन दिवसांत घर विक्रीचा आकडा हा 3 हजार 59 च्या घरात असल्याचे यावेळी समोर आले आहे.

‘रिअल इस्टेट कन्सल्टन्सी नाइट फ्रँक इंडिया’ने यासंदर्भातील सर्व्हे नुकताच पूर्ण केला आहे. त्यानुसार वरील माहिती समोर आली आहे. त्यांनी गेल्या वर्षभरातील घरांची नोंदणीद्वारे ही माहिती पुढे आणली आहे. मुख्य म्हणजे येत्या नवीन वर्षात मुद्रांक शुल्कात वाढ होणार आहे. त्यामुळे डिसेंबरमध्येच अनेकांनी आपल्या घरांची नोंदणी करण्यास सुरुवात केल्याने हा आकडा वाढल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत आहे.

2020 मध्ये राज्याच्या तिजोरीद्वारे घर नोंदणीतून प्राप्त झालेला एपूण महसूल अंदाजे रु. 3107 कोटी होता. एपूण महसुलापैकी सुमारे 43 टक्के (रु. 1350 कोटी) 1 सप्टेंबर ते 30 डिसेंबर 2020 या कालावधीत साध्य झाले. मुद्रांक शुल्काच्या कपातीमुळे महसुलावर किती मोठा परिणाम झाला हे त्याचे स्पष्ट संकेत म्हणून पाहिले जाऊ शकते. 1 जानेवारी ते 30 ऑगस्ट 2020 रोजी घर विक्री नोंदणीतून मुद्रांक शुल्क म्हणून एपूण रु. 1756 कोटी जमा झाले असल्याचे समोर आले आहे. १ सप्टेंबर पासून 2020 पासून 300 बेसिस पॉइंट (बीपीएस) कमी करण्याची घोषणा झाल्यापासून घरांची विक्री महिने दर महिने सातत्याने वाढली आहे. मुंबईत या कालावधीत 41,681 युनिट्सची नोंदणी झाली आहे. तर डिसेंबर 2019 मध्ये 6,433 युनिट्सची नोंदणी झाली होती तर डिसेंबर 2020 मध्ये 18,854 युनिट्सची नोंदणी झाली.

“मुद्रांक शुल्कामध्ये कपात झाल्यामुळे महाराष्ट्रातील विशेषतः मुंबईतील घरांच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली असून यामुळे या क्षेत्राच्या दीर्घकाळापासून संकटात असलेल्या रिअल इस्टेट क्षेत्राला दिलासा मिळाला आहे. सर्वात कमी गृहकर्ज दर, कमी किमतींसह सवलती आणि विकासकांनी दिलेल्या ऑफर्स तसेच वाढलेले घरगुती बचत दराचे मिश्रण यांनी निवासी खंडाच्या वाढीसाठी योग्य वाढीचे वातावरण प्रदान केले आहे”, असे ‘नाइट फ्रँक इंडिया’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल म्हणाले.