मुंबईतून आलेले ७५ टक्के कोरोनाग्रस्त – योगी आदित्यनाथ

0
398

अलाहाबाद, दि. २६ (पीसीबी) – महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशला गेलेल्या कामगारांवरून अगोदरच रान पेटलेले असताना आता त्यात तेल आतायचे काम खुद्द मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी केले आहे. “मुंबईहून युपीत परतलेल्या मजुरांपैकी 75 टक्के मजुरांना तर दिल्लीहून आलेल्यांपैकी 50 टक्के मजुरांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, असे ते म्हणाले. या विधानामुळे सर्व थरातून त्यांच्यावर चौफेर टीका केली जात आहे.

23 मे रोजी आयोजित केलेल्या एका वेबिनारमध्ये योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, “आतापर्यंत उत्तर प्रदेशात 23 लाख कामगार आणि मजुरांना इतर राज्यांतून आणण्यात आले. यामध्ये रेल्वे, बस आणि खासगी वाहनातून आलेली लोकही आहेत.”
योगी आदित्यनाथ म्हणाले, “मुंबईहून युपीत परतलेल्या मजुरांपैकी 75 टक्के मजुरांना तर दिल्लीहून आलेल्यांपैकी 50 टक्के मजुरांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसंच इतर राज्यांमधून आलेल्यांपैकी 20-30 टक्के लोकांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला आहे. यामुळे ही परिस्थिती आमच्यासाठी आव्हानात्मक असून आमची टीम यावर काम करतेय.”

75 हजारांहून अधिक वैद्यकीय टीम्स केवळ स्क्रीनिंगचे काम करत आहेत. वैद्यकीय स्क्रीनिंग, टेस्टिंग आणि विविध रुग्णालयांमध्ये सुरू असलेल्या उपचारांमुळे आम्ही कोरोनाचा फैलाव रोखू शकलोय, असंही ते म्हणाले.

काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी मात्र योगी यांच्या वक्तव्यावर काही प्रश्न उपस्थित केलेत. ट्वीटरवर त्यांनी सहा प्रश्न विचारले आहेत.त्यांनी ट्विटरवर लिहिलंय, “मुख्यमंत्र्यांनी केलेल्या दाव्यानुसार महाराष्ट्रातून आलेले 75 टक्के, दिल्लीहून आलेले 50 आणि इतर राज्यांतून आलेले 25 टक्के लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तेव्हा याचा अर्थ उत्तर प्रदेशात 10 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे असं समजायचं का ? पण सरकारी आकड्यांनुसार कोरोना बाधित रुग्णांची संख्या 6 हजार 228 सांगितली जात आहे.”