Maharashtra

मुंबईतील स्टेट बँक ऑफ मॉरिशसवर सायबर हल्ला; १४३ कोटींची लुट

By PCB Author

October 12, 2018

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – स्टेट बँक ऑफ मॉरिशसच्या नरीमन पॉइंट येथील शाखेत सायबर हल्ला झाला असून हॅकर्सनी १४३ कोटी रुपये लुटल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी स्टेट बँक ऑफ मॉरिशसच्या शाखेने ५ ऑक्टोबरला मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्टेट बँक ऑफ मॉरिशसची नरीमन पॉइंटची शाखा ही रहेजा सेंटर इमारतीत १५ व्या मजल्यावर आहे. हॅकर्सनी आधी बँकेचा सर्व्हर हॅक केला. यानंतर खातेदारांच्या खात्यांपर्यंत गेले. अनेक खात्यांमधून भारताबाहेर पैसे वळवण्यात आले. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक झालेली नाही. पण ‘या प्रकरणी एफआयआर दाखल झाली आहे. तसेच सायबर तज्ज्ञ तपासात मदत करत आहेत’.

दरम्यान, गेल्या ९ महिन्यात बँकांवर झालेला हा तिसरा मोठा सायबर हल्ला आहे. यापूर्वी फेब्रुवारीत चेन्नईतील युनियन बँकेच्या शाखांमधील ३४ कोटी रुपये लुटण्यात आले होते. यानंतर पुण्यात मुख्यालय असलेल्या कॉसमॉस बँकेचे ९४ कोटी रुपये लुटले गेले होते.