मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर गरबा, महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न

0
430

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ताबा आता पूर्णपणे अंदानी समुहाकडे गेला आहे. मुंबई विमानतळाचे व्यवस्थापन आधी GVK समुहाकडे होते. पण हा समूह आर्थिक संकटात सापडल्याने अदानी समुहाने विमानतळ खरेदीची प्रक्रिया सुरू केली होती. ही प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. गेल्या काही दिवसात वादग्रस्त ठरलेल्या अदानी समुहाने विमानतळ ताब्यात घेतल्यानंतर एक नवीन वाद निर्माण झाला आहे.

अदानी समुहाने विमानतळ ताब्यात घेतल्यानंतर विमानतळावर याचे सेलिब्रेशन करण्यात आले. यामध्ये विमानतळावरील कर्मचारी गरबा खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मुळात मुंबई विमानतळ ताब्यात घेतल्यानंतर गरबा खेळून त्याचे सेलिब्रेशन करण्याचा अदानी समुहाचा हेतू काय, हा मराठी अस्मितेशी खेळ आहे का, असा सवालही उपस्थित होत आहे. या प्रश्न उपस्थित होण्याचे कारण म्हणजे, सेलिब्रेशननंतर प्रसिद् उद्योगपती हर्ष गोयंका यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे “Mumbai airport celebrating the takeover by Gujarat!” मुंबई विमानतळ गुजरातने ताब्यात घेल्याचे सेलिब्रेशन, अशा आशयाचे हे ट्विट आहे. पण आता गोयंका यांच्या या ट्विटला कम्युनिस्ट नेते प्रकाश रेड्डी यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून यावर आक्षेप नोंदवला आहे. “हर्ष गोयंका यांना ह्या ट्वीद्वारे काय म्हणायचे आहे. मुंबई विमानतळाची मालकी अदानीकडे गेल्यामुळे मुंबई विमानतळाचा मालक गुजरात आहे म्हणून गुजराती लोक तेथे आनंदोत्सोव साजरा करता आहेत हे त्यांचे म्हणणे आहे काय?” असा सवालच रेड्डी यांनी उपस्थित केला आहे.

या प्रकाराला मनसेनेही आक्षेप घेतला आहे. मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी एक ट्विट करुन इशारा दिला आहे. “मुंबई विमानतळावरून GVK चे रेड्डी गेले आणि अदानी आले. व्यवस्थापन कोणाचे ही असो पण छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘आवाज’ हा मराठी माणसाचाच असेल हे लक्षात असू द्या. फक्त व्यवस्थापन अदानींकडे गेलय … विमानतळ मुंबईमध्येच आहे …. आम्हाला डीवचण्यासाठी ‘गरबा’ कराल तर आम्हालाही आमचा ‘झिंगाट’ दाखवावा लागेल.”