मुंबईतील क्रूझ पार्टी प्रकरणातील किरण गोसावीला फसवणूक प्रकारणी आता अखेर अटक

0
240

पिंपरी, दि.२४ (पीसीबी) : राज्यभरासह देशात गाजलेल्या क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणातील एनसीबीचा साक्षीदार असलेल्या किरण प्रकाश गोसावी (वय 36, रा. ठाणे) याच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल होता.

विदेशात नोकरी लावण्याच्या आमिषाने त्याने सव्वादोन लाखांची फसवणूक केल्याबाबत विजयकुमार सिद्धलिंग कानडे (वय 33, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी. मूळ रा. लातूर) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. भोसरी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सन 2015 मध्ये फिर्यादी कानडे नोकरी शोधत होते. त्यासाठी त्यांनी ऑनलाईन माध्यमातून अर्ज केले होते. त्याच दरम्यान वेगवेगळ्या जॉब पोर्टल वरून त्यांना नोकरीसाठी ऑफर येत होत्या. 21 मार्च 2015 रोजी कानडे यांना मेल आला. त्यात परदेशात हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात नोकरी असल्याचे नमूद केले होते. त्यासाठी कानडे यांचा बायोडेटा मागवण्यात आला. कानडे यांनी त्यांचा बायोडेटा मेलद्वारे पाठवून दिला.

आरोपी किरण गोसावी याने कानडे यांना ब्रुनेई येथे नोकरी लावतो, असे अमिश दाखवले. कानडे यांचा विश्वास संपादन करून नाशिक फाटा कासारवाडी येथे भेटून 30 हजार रुपये रोख स्वरूपात घेतले. त्यानंतर शिवा इंटरनॅशनल, माजीवाडा, ठाणे येथील कार्यालयात जाऊन 5 एप्रिल 2015 रोजी किरण गोसावीकडे कानडे यांनी 40 हजार रुपये दिले.

किरण गोसावीच्या सांगण्यावरून एका बँक खात्यावर कानडे यांनी 20 हजार रुपये पाठवले. वैद्यकीय तपासणीसाठी किरण गोसावी याच्या ठाणे येथील ऑफिसमध्ये जाऊन कानडे यांनी 10 हजार रुपये भरले. वेळोवेळी वेगवेगळ्या कारणांसाठी एकूण दोन लाख 25 हजार रुपये कानडे यांनी आरोपी किरण गोसावी याला दिले. पैसे घेऊन कानडे यांची गोसावी याने आर्थिक फसवणूक केली. जॉब पोर्टल वेबसाईट हॅक करून नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची माहिती चोरायची. उमेदवाराला संपर्क करून नोकरी लावण्याचे आमिष दाखवायचे. वेगवेगळ्या कारणांसाठी लाखो रुपये उकळायचे. नोकरी न लावता फसवणूक करायची. असा आरोपी किरण गोसावी फंडा वापरून अनेकांना गंडा घालत होता.

फिर्यादीला बोगस तिकीट आणि व्हिसा देखील गोसावी याने पाठवला होता. मात्र फिर्यादी कानडे विमानतळावर गेल्यावर तिकीट आणि व्हिसा बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर कानडे यांनी पाठपुरावा केला. गोसावी याने कानडे यांचे फोन उचलणे बंद केले. गोसावीने त्याचे ऑफिस देखील बंद केले आणि परागंदा झाला. आर्यन खान ड्रग्स प्रकरणात टीव्हीवर किरण गोसावी बाबत बातम्या पाहिल्यानंतर फिर्यादी यांना फसवणारा देखील हाच किरण गोसावी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तक्रार दिली.