‘मुंबईचा डबेवाला आता राज ठाकरेंच्या भेटीला; कृष्णकुंज वर भेट घेत केली ‘हि’ विनंती’

0
185

मुंबई,दि.२४(पीसीबी) : कोरोना लॉकडाऊन मध्ये सगळ्या व्यवहार, व्यवस्था ठप्प झाल्या. नंतर कोरोना अनलॉकपासून मुंबईच्या डबेवाल्यांच्या शिष्टमंडळानं आज मनसे प्रमुख राज यांची त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईच्या डबेवाल्यांकडून रेल्वेनं प्रवास करू देण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र रेल्वे प्रशासानानं त्यांची मागणी मान्य केली नव्हती. आता मात्र आज राज ठाकरे यांच्या भेटीदरम्यान डबेवाल्यांनादेखील रेल्वेनं प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी प्रमुख मागणी करत विनंती केली आहे. यावेळी मुंबई डबेवाला असोसिएशनचे सुभाष तळेकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं राज ठाकरेंची भेट घेत त्यांना याबाबतचे निवेदन दिले.

“लोकलमधून आम्हाला परवानगी देण्यात येत नाही तर किमान अत्यावश्यक सेवांमध्ये आमची सेवा सामावून घेत प्रवास करू देण्यात यावा अशीही विनंती आम्ही केली होती. परंतु तीदेखील मान्य करण्यात आली नाही. आमची मागणी मनसेनं उचलून धरली आणि त्यांनी आंदोलन केलं. यासाठी आम्ही त्यांचे आभार मानण्यासाठी आलो आहोत. मनसेनं आदोलन करून वात पेटवली आहे. त्याचा भडका केव्हाही होऊ शकतो. थोड्याफार प्रमाणात तरी सरकारनं सेवा सुरू करावी,” असंही यावेळी सांगण्यात आलं.

राज ठाकरेंच्या भेटीआधी शिष्टमंडळाकडून सांगण्यात आलं कि, “दोन दिवसांपूर्वी मनसेनं मुंबईत लोकल प्रवास करत सविनय कायदेभंगाचं आंदोलन केलं होतं. बहुतांश मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी लोकलनं प्रवास केला होता. मुंबईतील लोकल सेवा पूर्ववत करावी अशी त्यांची मागणी होती. डबेवाल्यांनी महिनाभरापूर्वी रेल्वे प्रशासनाकडे परवानगी मागितली होती. मुंबईकरांप्रमाणेच डबेवाल्यांची लाईफलाईनही लोकल रेल्वे सेवा आहे. परंतु रेल्वे प्रशासनानं आमची मागणी मान्य केली नाही,” असं त्यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना सांगितलं.