“मुंबईकरांनी खूप भोगलंय; हात जोडून विनंती करतो, मेट्रोचा विषय वैयक्तिक प्रतिष्ठेचा करू नका”

0
198

मुंबई,दि.२०(पीसीबी) – हवं तर कांजूरमार्ग मेट्रोचं श्रेय तुम्हाला देतो, पण कद्रूपणा सोडा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना केलं असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर पटलवार केला आहे. हा श्रेयाचा प्रश्नच नाही. मुंबईकरांनी आधीच खूप भोगलंय. त्यांना आणखी त्रास देऊ नका. हा प्रश्न वैयक्तिक प्रतिष्ठेचा करू नका. तुम्हाला हात जोडून विनंती आहे, अशी कळकळीची विनंती देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी कांजूरमार्ग मेट्रोच्या प्रश्नावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ही कळकळीची विनंती केली आहे. प्रश्न श्रेयाचा नाहीच. तर मुंबईकरांच्या सोयी-सुविधांचा आहे. श्रेयासाठी काम करणं हा भाजपचा स्वभाव नाही. त्यामुळे हा प्रश्न अपश्रेयाचा करू नये आणि हे अपश्रेय तुमच्या वाटेला येऊ नये हीच सदिच्छा, असा टोला फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. यावेळी कारशेडसाठी भविष्यात अतिरिक्त जागा लागणार असल्याचा मुख्यमंत्र्यांचा मुद्दाही फडणवीस यांनी खोडून काढला. भविष्यात कोणतीही अतिरिक्त जागा कारशेडसाठी लागणार नाही. मग ही दिशाभूल कशासाठी? असा सवाल फडणवीस यांनी केला आहे.

दरम्यान मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेशी 30 मिनिटे संवाद साधला, पण त्यांनी अजूनही महाविकास आघाडी सरकारच्याच उच्चाधिकार समितीने कांजूर मार्ग कारशेडसाठी दिलेला अहवाल वाचलेला नाही, हे प्रकर्षाने जाणवलं, असा चिमटा काढतानाच मुख्यमंत्र्यांनी एकदा हा अहवाल सार्वजनिक करावाच. प्रत्यक्ष स्थिती, भूमिका आणि वास्तव महाराष्ट्रातील जनतेसमोर आणाच, असं आव्हानही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं. कांजूरमार्गमध्ये कारशेड नेल्याने राज्याचं मोठं आर्थिक नुकसान होणार असल्याचं या समितीने स्पष्ट केलं असून चार वर्षाचा विलंबही होणार असल्याचं म्हटलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.