मुंढेंच्या बदलीनंतर फटाके फोडणे नाशिकच्या महापौरांना पडले महागात

0
4318

नाशिक, दि. २३ (पीसीबी) – नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदावरुन तुकाराम मुंढेंची बदली झाल्यानंतर आपल्या शासकीय बंगल्यासमोर फटाके फोडणं नाशिकच्या महापौरांना महागात पडण्याची शक्यता आहे. रंजना भानसी यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

तुकाराम मुंढे यांची नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदावरुन काल मुंबईतील नियोजन विभागातील सहसचिवपदी बदली झाली. बदलीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांच्या समर्थकांनी ‘रामायण’ या महापौर बंगल्यासमोर फटाके फोडले होते. मुंढे समर्थकांनी महापौर रंजना भानसी यांच्याविरोधात नाशकातील सरकारवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. दुपारी १२ ते एक या वेळेत फटाके उडवत न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी नाशिककरांनी केली.

तुकाराम मुंढेंच्या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्या १७ जणांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटकाही करण्यात आली. परवानगी न घेता आंदोलन करणे, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.