मुंडक्‍यावर पाय देऊन निवडणूक जिंकणार; रावसाहेब दानवे पुन्हा घसरले

0
7205

धुळे, दि. १८ (पीसीबी) – महापालिका निवडणुकीत कुणी आडवे आले, तर त्याच्या मुंडक्‍यावर पाय देऊन  निवडणूक जिंकणार आहोत, असे वादग्रस्त विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले आहे. या प्रकरणी व्हीडीओ रेकॉर्डिंग तपासून त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, निवडणूक निर्णय अधिकारी तथा महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी  सांगितले. यामुळे दानवे अडचणीत येण्याची शक्यता आहे.

महापालिका निवडणुकीच्या  प्रचारासाठी भाजपचा जे. बी. रोडवर महापालिका विजय संकल्प मेळावा आयोजित केला होता. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना    दानवे यांनी अतिउत्साहात वादग्रस्त विधान केले. दरम्यान या आधीही दानवे यांनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधान केले होते, त्यावेळी त्यांच्यावर विरोधकांकडून टीकेची झोड उठवण्यात आली होती. पक्षानेही त्यांना खडसावल्याचे बोलले जात होते.

दरम्यान, दानवे यांनी केलेले वादग्रस्त विधान आचारसंहितेचा भंग ठरत नाही का?  असा सवाल उपस्थित  केला जात आहे. त्यावर सचिव चन्ने आणि निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त देशमुख म्हणाले की,  दानवे यांच्या विधानाबाबत व्हीडीओ रेकॉर्डिंग’ तपासून योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे.