Maharashtra

मी १०१ टक्के सांगतो, नथुराम गोडसेंचा जन्म बारामतीत झाला- सुधीर मनगुंटीवार

By PCB Author

June 26, 2019

मुंबई, दि. २६ (पीसीबी) – नथुराम गोडसे यांचा जन्म बारामतीचा आहे, हे दुर्दैव आहे. माझ्याकडे प्रमाणपत्र नाही, इंटरनेटवर आहे, त्याचे प्रिंट आऊट काढा.  मी १०१ टक्के सांगतो त्यांचा जन्म हा बारामतीतच झाला आहे, अशा शब्दांत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मनगुंटीवार यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्त राज्य सरकार मोठा कार्यक्रम करणार आहे. या कार्यक्रमावरून विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. या टीकेला  मनगुंटीवार यांनी  चोख प्रत्युत्तर  दिले.

मंत्री मनगुंटीवार म्हणाले की,  महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्य आंदोलनातील सर्वात जास्त काळ महाराष्ट्रात व्यतित केला होता. ही बाब आपल्यासाठी अभिमानाचा विषय आहे. गांधींनी चले जावचा नारा गवालिया टँकवर दिला. गवालिया टँकवर चलेजावच्या आंदोलनाचा स्तंभ उभा केला आहे. त्यावर कमळाचे फूल आहे, असे मनगुंटीवार म्हणाले.

युती सरकारच्या काळात महात्मा गांधींऐवजी त्यांचे खुनी नथुराम गोडसेचा उदो उदो केला जात आहे, अशी टीका विरोधकांनी केली होती. यावर  नथुराम गोडसेंचा जन्म बारामतीला झाला,  असा पलटवार  मनगुंटीवार यांनी केला आहे.