Desh

मी स्वार्थी नाही; मी फक्त टीमचाच विचार करतो – रहाणे

By PCB Author

August 23, 2019

अँटिगा, दि. २३ (पीसीबी) – वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत जेव्हा अजिंक्य रहाणे जेव्हा फलंदाजीसाठी आला तेव्हा भारताची धावसंख्या ३ बाद २५ होती. संकटात असलेल्या टीमला अजिंक्यने ८१ धावांच्या दमदार खेळीने सावरले. या डावात त्याचे शतक हुकले, पण त्याचे त्याला दु:ख नाही. ‘मी स्वार्थी नाही. मैदानात असतो तेव्हा मी फक्त टीमचाच विचार करतो,’ असे रहाणे म्हणाला.

दिवसभराचा खेळ संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रहाणे म्हणाला, ‘मला वाटते या विकेटवर ८१ धावांचा खेळही खूप होता आणि आता आम्ही या कसोटीत चांगल्या स्थितीत आहोत. मी जेव्हा मैदानात असतो तेव्हा फक्त टीमचाच विचार करतो, मी स्वार्थी नाही. त्यामुळे मला शतक हुकल्याचे दु:ख नाही.’

रहाणे पुढे म्हणाला, ‘टीमसाठी केलेले योगदान जास्त महत्त्वाचे ठरते. मी माझ्या शतकाबद्दल विचार करत होतो. पण त्याची मला फार चिंता नव्हतो. परिस्थितीनुसार खेळणे अधिक महत्त्वाचे होते.’ रहाणेने यापूर्वीचे शतक २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध बनवले होते.