“मी सांगेल त्या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालयात यायचं आणि खरेदीखतावर सह्या करायच्या, अन्यथा तुम्ही पुढील वर्ष बघणार नाहीत”

0
822

– जमीन मालकाला धमकी देत कोणताही मोबदला न देता कब्जा, पोलीस ठाण्यातच टोळक्याकडून बेदम मारहाण

पुणे/पिंपरी, दि.०४ (पीसीबी) : बाजारभावापेक्षा कमी भावाने जमीन विकण्याचा अनेक दिवस दबाव आणला. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याच्या निमित्ताने खेड पोलीस ठाण्यात बोलावून घेत तिघांना 25 जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. पोलीस ठाण्यात ‘मी सांगेल त्या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालयात यायचं आणि खरेदीखतावर सह्या करायच्या, अन्यथा तुम्ही पुढील वर्ष बघणार नाहीत. त्यापोटी दिलेले धनादेश 7/12 नावावर झाल्यावर माझ्या समोर फाडून टाकायचे’ अशी धमकी देत जमिनीवर कब्जा केला. हा प्रकार डिसेंबर 2019 ते 30 डिसेंबर 2020 या कालावधीत खेड पोलीस ठाणे आणि दुय्यम निबंधक कार्यालय येथे घडला आहे.

सुदाम मटलामल नारंग (वय 58, रा. सोपानबाग, पुणे), संदीप भोगीलाल शहा, नरेंद्र रीखबदास संचेती अशी मारहाण झालेल्यांची नावे आहेत. नारंग यांनी याबाबत 29 मार्च रोजी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, संतोष घनश्याम डोळस (चांडोली, ता. खेड), त्याची पत्नी, बहिण आणि अन्य 20 ते 22 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी नारंग हे शेती आणि बांधकाम व्यवसाय करतात. त्यांनी आणि संदीप शहा व अपूर्व शहा यांच्या सोबत मिळून खेड तालुक्यातील चांडोली गावात जमीन खरेदी केली होती. जमिनीत जाण्या-येण्यासाठी त्यांनी आरोपी संतोष डोळस याच्या कुटुंबियांकडून सात लाख 50 हजार रुपये देऊन रस्त्याचे हक्क खरेदी केले होते. त्यानंतर डोळस याने फिर्यादी यांना त्यांच्या जमिनी विकत मागितल्या. मात्र डोळस देत असलेला मोबदला बाजारभावापेक्षा कमी असल्याने फिर्यादी यांनी त्यास नकार दिला.

दरम्यान, दोन जमिनींपैकी एका जमिनीचे प्लॉटिंग करून फिर्यादी यांनी एका मध्यस्थीच्या माध्यमातून विकले. डोळस याला याबाबत माहिती समजल्यानंतर त्याने विकेलेल्या जमिनींचे व्यवहार रद्द करून मी सांगेल त्या भावात मलाच जमीन द्यायची, अशी मागणी केली. जमीन दिली नाही तर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने राजगुरूनगर पोलीस ठाण्यात ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार अर्ज दिला. काही दिवसांनी पोलीस ठाण्यातून फिर्यादी यांना फोन आला आणि त्यांचा याबाबत जबाब देण्यास सांगितले. त्यासाठी फिर्यादी पोलीस ठाण्यात गेले असता सर्व आरोपींनी फिर्यादी, संदीप शहा व नरेंद्र संचेती यांना चप्पल, बुटांनी तोंडावर व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

जीवाच्या भीतीने फिर्यादी राहिलेली जमीन डोळस याच्या नावावर करून देण्यास तयार झाले. डिसेंबर 2020 मध्ये डोळस, एक महिला आणि एक पोलीस संदीप शहा यांच्या सदाशिव पेठ, पुणे येथील कार्यालयात आले. त्यांनी येतानाच खरेदी खत तयार करून आणले होते. त्यावर संदीप शहा आणि फिर्यादी यांच्या सह्या घेतल्या. संदीप शहा यांच्या कार्यालयातून जाताना डोळस याने धमकी दिली की – ‘मी सांगेल त्या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालयात यायचं आणि खरेदीखतावर सह्या करायच्या, अन्यथा तुम्ही पुढील वर्ष बघणार नाहीत. मी दिलेले चेक्स फक्त खरेदीखतामध्ये लिहिलेले आहेत. ते वाटवायचे नाहीत. 7/12 झाल्यानंतर सर्व चेक्स माझ्या समोर फाडून टाकायचे.’

दरम्यान, फिर्यादी आणि शहा यांनी प्लॉटिंग करून विकेलेल्या जमिनीच्या खरेदीदार नागरिकांना डोळस याने त्रास दिला. त्यांचा सामायिक रस्ता बंद केला. त्यामुळे काही प्लॉट धारकांनी फिर्यादी यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. खेड पोलीस तपास करीत आहेत.