“मी शेतकऱ्यांसोबत आहे.” भाजपा नेते बिरेंद्र सिंह यांचा मोदी सरकारला इशारा

0
253

नवी दिल्ली, दि.१९ (पीसीबी) : नव्या शेतकरी कायद्यांबद्दल मोदी सरकार विरुद्ध आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ भारत बंद सुद्धा पाळला होता. विरोधी पक्षाचे शिष्टमंडळ आता या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रपतींना भेटले. आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून बैठका घेण्यात आल्या असून या आंदोलनाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांचा आरोप प्रत्यारोपांचा खेळ सुरूच आहे. मात्र आता खुद्द भाजपा नेते आणि माजी केंद्रीय मंत्री बिरेंद्र सिंह यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.

माजी केंद्रीय मंत्री चौधरी बिरेंद्र सिंह यांनी शुक्रवारी नव्या शेतीविषयक कायद्यांना विरोध दर्शवत नव्या कायद्यांविरोधात सुरू असलेलं आंदोलन हे आता केवळ शेतकऱ्यांपुरतंच मर्यादित नसून सर्व जनसामान्यांचे आंदोलन झाले आहे, असं त्यांनी स्पष्ट केले.

“मी या शेतकऱ्यांसोबत आहे. हे आंदोलन केवळ शेतकऱ्यांचं नव्हे, तर साऱ्यांचं आहे. समाजातील एखाद्या ठराविक गटाचं हे आंदोलन नाही. मी आता शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरलो आहे. मी जर आंदोलनात सहभागी झालो नसतो तर लोकांना वाटलं असतं की मी केवळ राजकारण करत आहे. पण आता मी निर्णय घेतला आहे. तुम्ही कोणाशीही चर्चा करा. शिक्षक, विद्यार्थी, कामगार, मजूर, नोकरदार, गृहिणी… साऱ्यांना या आंदोलनाची काळजी आहे. या आंदोलनावर तोडगा निघावा असं सगळ्यांनाच वाटतं. मीदेखील या आंदोलनाशी जोडला गेलो आहे. गेले ५-६ दिवस दिल्लीत थंडी खूपच जास्त आहे, पण ते आंदोलन करत आहेत. मीदेखील लवकरच दिल्लीत जाऊन आंदोलनात सहभागी व्हावं अशी माझी इच्छा आहे”, असं म्हणत दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात सहभागी होण्याची इच्छादेखील बिरेंद्र सिंग यांनी व्यक्त केली.