Desh

‘मी शेतकऱ्यांचा संदेश घेऊन आलोय’ म्हणत राहुल गांधी चक्क ट्रॅक्टरवरुन संसदेत

By PCB Author

July 26, 2021

नवी दिल्ली, दि.२६ (पीसीबी) : दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात राहुल गांधी थेट ट्रॅक्टरवरुन संसदेत दाखल झाले. मात्र राहुल गांधी यांचा ट्रॅक्टर संसदेच्या गेटवरच थांबवण्यात आला. यावेळी राहुल गांधी यांनी ‘मी शेतकऱ्यांचा निरोप घेऊन आलो आहे’, असं राहुल गांधी म्हणाले. संसदेचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरु असून काँग्रेससह विरोधकांनी पेगॅसस प्रकरण, कृषी कायद्यांसह विविध मुद्द्यावरुन सत्ताधारी भाजपला घेरण्याची तयारी केली आहे. यावेळी काँग्रेस खासदारांनी ‘पेगॅसस प्रोजेक्ट’ रिपोर्टवर चर्चा करण्यासाठी संसदेत स्थगन प्रस्ताव नोटीस दिली आहे.

राहुल गांधी म्हणाले, मोदी सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबत आहे. संसदेत कृषी कायद्यांवर चर्चाच होऊ दिली जात नाही. शेतकरीविरोधी काळे कायदे रद्द करायलाच हवेत. हे शेतकरी हिताचे नव्हे तर 2-3 बड्या उद्योजकांसाठी कायदे आहेत”. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस गदारोळग्रस्त होता आणि दोन्ही सभागृह तहकूब करावे लागले. संसदेचे अधिवेशन सुरू होण्याच्या आदल्या दिवशी रविवारी हेरगिरी प्रकरण उघड झाल्याने सोमवारी संसदेच्या आत व बाहेरही गोंधळ उडाला. रिपोर्ट्सनुसार, जागतिक सहयोगी तपासणी प्रोजेक्टमधून असे उघडकीस आले आहे की, इस्त्रायली कंपनी, एनएसओ ग्रुपच्या पेगासस स्पायवेअरने भारतातील 300 हून अधिक मोबाईल नंबरला लक्ष्य केले, ज्यामध्ये सध्याच्या सरकारचे दोन मंत्री, तीन विरोधी नेते, एक न्यायाधीश, अनेक पत्रकार आणि बरेच व्यापारी यांचा समावेश आहे. या घटनेवर विरोधकांनी केंद्र सरकारला घेराव घालण्याचा प्रयत्न केला आणि अनेक आरोप केले.