मी शहीद करकरेंचा अपमान केलेला नाही; साध्वी प्रज्ञासिंह यांचे निवडणूक आयोगाला उत्तर

0
442

नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) – भाजपाच्या भोपाळ लोकसभेच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी निवडणूक आयोगाच्या नोटीशीला उत्तर दिले आहे. आपण कोणत्याही शहीदाचा अपमान केला नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी या उत्तरात दिले आहे. साध्वी मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी असून सध्या जामीनावर बाहेर आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी २६/११ च्या मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत करकरेंविरोधात वादग्रस्त विधान केलं होतं. याप्रकरणी निवडणूक आयोगाने साध्वींना कारणे दाखवा नोटीस पाठवली होती.

साध्वी प्रज्ञा यांनी उत्तरात म्हटले की, मी आपल्या भाषणात कोणत्याही शहीदाच्या मृत्यूबाबत आक्षेपार्ह विधान केलेले नाही. माझ्या भाषणाची केवळ एकच ओळ न पाहता संपूर्ण भाषण पाहिले पाहिजे. यामध्ये मी तत्कालीन काँग्रेस सरकारकडून मला देण्यात आलेल्या यातनांबाबत उल्लेख केला होता.

माझ्यासोबत त्यावेळी जे झालं ते जनतेसमोर ठेवणं हा माझा अधिकार आहे. माझ्या वक्तव्याला माध्यमांनी मोडून-तोडून सादर केलं आहे. मात्र, जनभावनेचा सन्मान करताना मी माझे विधान मागे घेतले होते. मी असे कुठलेही कृत्य केलेले नाही किंवा भाषणही दिलेले नाही, ज्यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन होईल.

दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात साध्वी प्रज्ञा सिंह यांनी मुंबई हल्ल्यावेळचे मुंबई एटीएसचे प्रमुख शहीद हेमंत करकरे यांच्यावर आरोप केले होते. त्यांनी म्हटलं होतं की, त्यावेळी मुंबईच्या तुरुंगात सुरक्षा आयोगाच्या सदस्यांनी करकरे यांना सांगितले होते की, जर साध्वीविरोधात पुरावे नाहीत तर त्यांना सोडून द्या. मात्र, करकरेंनी आपण कुठूनही पुरावे घेऊन येऊ मात्र साध्वीला सोडणार नाही, असे म्हटले होते.