मी शरणागती पत्करलीय; कॅन्सरग्रस्त इरफानचा खुलासा

0
1310

लंडन, दि. १९ (पीसीबी) – ‘आपले आयुष्य किती क्षणभंगूर आहे हे मला कॅन्सर झाल्यावर लक्षात आले. आयुष्यासमोर मी माझी सगळी शस्त्र टाकून देऊन शरणागती पत्करलीय. पुढच्या ८ महिन्यांनी किंवा २ वर्षांनी माझे काय होईल मला माहीत नाही…पण मी आता चिंता करणे सोडून दिले…गोष्टींच्या मागे पळणे सोडून दिले…’असे म्हणत कॅन्सरमुळे हतबल झालेल्या अभिनेता इरफान खान याने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

अभिनेता इरफान खान सध्या न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमरने ग्रस्त असून परदेशात उपचार घेत आहे. या दरम्यान, एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्याने अनेक गोष्टींचा उलगडा केला. ‘न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर हा शब्द आता माझ्या आयुष्याच्या शब्दकोशाचा भाग बनला होता. हा अत्यंत दुर्मिळ परंतु वेगाने शरीराचा ताबा घेणारा कॅन्सरचा प्रकार आहे. त्यामुळे उपचाराची ठोस दिशाही निश्चित नव्हती. मी एव्हाना एका प्रयोगाचा हिस्सा झालो होतो.’ असेही तो म्हणाला.

‘आजार होण्याआधी मी एका वेगळ्याच खेळाचा भाग होतो. मी एका अत्यंत वेगात जाणाऱ्या ट्रेन सफरीचा जणू आनंद लुटत होतो..जिथे माझी काही स्वप्न होती, इच्छा – आकांक्षा होत्या…त्या पूर्ण करण्यात मी व्यग्र होतो…आणि अचनाक माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला मी मागे वळून पाहिले तर तो टी.सी होता…त्याने मला सांगितले…तुम्ही उतरण्याचे ठिकाण आले…आता उतरा खाली…मी एकदम थबकलो, मला इथे उतरायचे नाही असे त्याला वारंवार सांगत राहिलो. परंतु, तो वारंवार मला सांगत राहिला…नाही ..नाही…हेच तुझे स्थानक आहे… इच्छित स्थळी पोहोचण्यापूर्वीच तुम्हाला गाडीतून उतरण्यास सांगितले जावे, माझ्या आयुष्याबाबत असेच घडलेय.’