मी वादळातही शिवसेना वाढवून दाखवणार; उद्धव ठाकरे यांचे भाजपाला अप्रत्यक्ष आव्हान

0
349

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगात येत असताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपालाच अप्रत्यक्ष आव्हान दिले आहे. उद्धव ठाकरे यांनी सामनाला मुलाखत दिली. या मुलाखतीत ठाकरे यांनी युतीपासून ते राम मंदिरापर्यंतच्या मुद्यावर भाष्य केले. जागा वाटपाच्या प्रश्नांवर बोलताना ते म्हणाले, “वादळ असते तेव्हा शांत राहायचे. पण याच वादळात मी माझी शिवसेना वाढवून दाखवणार,” असे सांगत त्यांनी भाजपाला अप्रत्यक्ष आव्हान दिले.

सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. राऊत यांनी महाराष्ट्राच्या राजकारणासह शिवसेनेची युती करण्यामागची भूमिका, राम मंदिराचा प्रश्न, आदित्य ठाकरेंचा राजकीय प्रवेश यासंदर्भात प्रश्न केले. भाजपा-शिवसेना युतीच्या जागावाटपावरून राऊत यांनी “शिवसेनेच्या इतिहासातील हा पहिला कमी आकडा आहे,” असा प्रश्न केला.  या प्रश्नाला उद्धव ठाकरे म्हणाले, “मी युतीसाठी तडजोड केली. पण ती महाराष्ट्राच्या हितासाठी केली. मी एकटा कधीही लढू शकतो. १२४ जागा ही तडजोड नाही. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील म्हणत होते की, आमची अडचण उद्धवजींनी समजून घ्यावी. ती मी समजून घेतली. शिवसेनेच्या आयुष्यातील हा कमी आकडा असला, तरी त्याबरोबर शिवसेनेचे जास्तीत जास्त आमदार जिंकण्याचा पहिला टप्पा असेल. शिवसेनाप्रमुख सांगायचे जेव्हा वादळ असते, तेव्हा शांत राहायचे. वादळ म्हटल्यावर सगळे पालापाचोळ्यासारखे उडून जातात. मी वादळात माझी शिवसेना वाढवून दाखवणार. इतर पक्ष उखडून फेकले जात असताना शिवसेनेची मूळ रूजवून दाखवणार,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्र हा धृतराष्ट्र नाही. समजूतदारपणा आम्ही दाखवला आहे. ब्ल्यू सीच्या पत्रकार परिषदेत जबाबदारी आणि समसमान वाटप हा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे २४ तारखेला निकाल येणार. त्याच्यानंतर आठ दहा दिवसात मंत्रिमंडळ स्थापन होईल. त्यानंतर समसमान वाटप म्हणजे काय हे लोकांना कळेल. त्यावर माझा विश्वास आहे,” असे सांगत ठाकरे यांनी मंत्रिमंडळात शिवसेनेला समसमान खाती मिळाणार असल्याचे संकेत दिले.