मी युती सरकारचे विष पचवतोय; कुमारस्वामींना अश्रू अनावर

0
468

नवी दिल्ली, दि. १५ (पीसीबी) – कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी पुन्हा एकदा युती सरकार चालवताना येणाऱ्या अडचणींचा पाढा वाचला आहे. अडचणी सांगताना कुमारस्वामी भावूक झाले आणि त्यांना अश्रू अनावर झाले. यावेळी बोलताना त्यांनी युती सरकारचे विष पचवावे लागत आहे, असे विधान केले आहे. शनिवारी बंगळुरूमध्ये शेतकऱ्यांचे कर्ज माफ केल्याबद्दल जनता दल सेक्युलरने कुमारस्वामींच्या सन्मानासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी कुमारस्वामींनी आपले दुःख बोलून दाखवले.

यावेळी बोलताना कुमारस्वामी म्हणाले, माझ्या पक्षातील लोक आनंदात आहेत कारण त्यांचा अन्ना (भाऊ)मुख्यमंत्री झाला आहे. मात्र, वर्तमान स्थितीमुळे मी अजिबात खूष नाहीये. कोणालाही न सांगता स्वतःचे दुःख लपवावे लागत आहे, जे वीष पचवण्यापेक्षा कमी नाहीये. सध्या जे काही चालले आहे, त्यामुळे मी अजिबात आनंदी नाहीये. ज्या सरकारला स्पष्ट जनादेश मिळालेला नाही, त्या सरकारचे नेतृत्व करण्यात कोणताच आनंद मला नाहीये. गेल्या एका महिन्यापासून कर्जमाफीसाठी अधिकाऱ्यांकडे किती विनंती करावी लागली आणि अजून काय-काय करावे लागल आहे, हे मलाच माहितीये. आता अन्नभाग्य योजनेअंतर्गत ५ किलोच्या जागी ७ किलो तांदूळ मागतायेत, मी २५०० कोटी रुपये कुठून आणू , अशा शब्दांमध्ये कुमारस्वामी यांनी हतबलता व्यक्त केली.

मुख्यमंत्री बनण्यामागे माझा कोणताही स्वार्थ नव्हता, केवळ जनतेची सेवा करण्यासाठी मुख्यमंत्री बनायची इच्छा होती, असे म्हणताना त्यांनी कर्नाटकच्या जनतेवरही आपला रोष व्यक्त केला, मतदानाच्या वेळी जनता त्यांना आणि त्यांच्या पक्षाला विसरली होती असे ते म्हणाले. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत १०४ जागा जिंकून भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला होता पण त्यांना पूर्ण बहुमत मिळाले नाही. भाजपाचे राज्यातील प्रमुख नेते बीएस येडियुरप्पांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. पण बहुमताअभावी ते औट घटकेचे मुख्यमंत्री ठरले. २२४ सदस्यांच्या कर्नाटक विधानसभेत बहुमतासाठी ११२ आमदारांचा पाठिंबा आवश्यक असताना काँग्रेस आणि जेडीएसने एकत्र येऊ येथे सरकारस स्थापन केले. या दोन्ही पक्षांकडे एकत्रित मिळून ११६ आमदार आहे. काँग्रेसचे ७८ आमदार निवडून आले आहेत.