मी मुर्ख आहे, पण इतकाही मोठा मुर्ख नाही- मणिशंकर अय्यर

0
691

शिमला, दि. १५ (पीसीबी) – हो! मी मुर्ख आहे. पण माध्यमं समजतात तितकाही मोठा मुर्ख नाही. तुमच्या या खेळामध्ये मी आता अडकणार नाही अशी ताकीदच मणिशंकर अय्यर यांनी माध्यमांना दिली आहे. ‘मोदी नीच आहे’ या विधानाची पुनरावृत्ती केल्यामुळे मणिशंकर अय्यर यांच्यावर टीकेची झोड उठते आहे.

लोकसभा निवडणुकांदरम्यान प्रदीर्घ काळ माध्यमांपासून दूर राहणारे काँग्रेस प्रवक्ते मणिशंकर अय्यर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. एका वर्तमानपत्रात नुकताच अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणारा एक लेख लिहिला आहे. या लेखात मोदी नीच आहेत हे २०१७मध्ये मी केलेले विधान योग्यच होते असे मणिशंकर अय्यर यांनी रेटून सांगितले आहे. देशाला आतापर्यंत मिळालेला सगळ्यात फाटक्या तोंडाचा पंतप्रधान मोदी आहेत असेही अय्यर यांनी लिहिले आहे.

या लेखामुळे भाजपने अय्यर यांच्यावर सडकून टीका केली आहे. या निवडणुकांमध्ये माध्यमांपासून आलिप्त राहणाऱ्या अय्यर यांची अखेर पत्रकारांनी शिमला येथे भेट घेतली. या प्रकारावर आपले काय मत आहे असे विचारले असता अय्यर म्हणाले, ‘मी मुर्ख आहे पण इतकाही मोठा मुर्ख नाही. यापुढे तुमच्या या खेळाचा भाग होणार नाही. तुम्ही आतापर्यंत माझ्या विधानांचा अनेकदा गैरवापर केला आहे. यापुढे तुम्हाला मी असे करू देणार नाही’. यावेळी अय्यर यांनी माध्यमांना मधमाशीची उपमा दिली आहे. ‘ आज माध्यम मधमाशीसारखी झाली आहेत. जिथे मध दिसेल तिथेही फिरत जातात. सत्य न जाणता बातम्यांचा स्वत:च्या स्वार्थासाठी वापर करतात. माझा पूर्ण लेख न वाचता एका विधानावरून माध्यमांनी मला लक्ष करत आहेत.’