मी माझा सर्वात जवळचा मित्र गमावला- नरेंद्र मोदी

0
397

नवी दिल्ली, दि. २४ (पीसीबी)-  देशाच्या राजकारणातला दिग्गज नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. अरुण जेटली यांची उणीव कायम भासेल त्यांच्या निधनामुळे अतीव दुःख झाल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. मी माझा सर्वात जवळचा मित्र गमावला असेही मोदी यांनी म्हटलं आहे. अरुण जेटली यांची पत्नी संगीता आणि मुलगा रोहन यांच्याशी मी फोनवरुन चर्चा केली. तुमच्या दुःखात सहभागी आहे असे सांगत मी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला असेही मोदी यांनी म्हटले आहे. तसेच तुम्ही दौरा रद्द करु नका असे त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्याला सांगितले असल्याचेही मोदी यांनी म्हटले आहे.

माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांना दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वसनाचा त्रास होत होता. ९ ऑगस्टपासून त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काहीतरी किमया घडेल आणि जेटली यांचे प्राण वाचतील अशी अपेक्षा भाजपातल्या सगळ्याच नेत्यांना होती. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह भाजपातल्या दिग्गज नेत्यांनी एम्स रुग्णालयात जाऊन त्यांची भेटही घेतली होती. मात्र आज अखेर दुपारी १२ वाजून ७ मिनिटांच्या सुमारास अरुण जेटली यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर भाजपातल्या दिग्गज नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. तसेच इतर पक्षातल्या नेत्यांनीही अरुण जेटली यांच्या निधनाबाबत दुःख व्यक्त केले आहे