मी निवडणूक लढवावी की नाही, याचा निर्णय उद्धवसाहेब घेतील – आदित्य ठाकरे

0
352

मुंबई, दि. ११ (पीसीबी) –  मी निवडणूक लढवावी की नाही याचा निर्णय शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहेब आणि पक्षाचे नेते घेतील, असे सूचक विधान युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले आहे. वरळी आणि माहिम विधानसभा मतदार संघातील युवासेना पदाधिकारी आणि आदित्य ठाकरेंची  सोमवारी बैठक झाली. या बैठकीनंतर आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत सूचक विधान केले आहे.

या बैठकीला उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि माहिमचे शिवसेना आमदार सदा सरवणकर, वरळीचे शिवसेना आमदार सुनील शिंदे उपस्थित होते. या बैठकीला आदित्य ठाकरेंनी माहिम आणि वरळी विधानसभा मतदार संघातील युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना लोकसभा निवडणुकीच्या मतांची तपशीलवार आकडेवारी घेऊन उपस्थित राहण्यास सांगितले होते.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पदाधिकारी-कार्यकर्त्याना नवीन मतदार नोंदणीचे लक्ष्य ठरवून देण्यात आले आहे. तसेच माहिम आणि वरळी मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला कोणत्या भागात मतदान कमी झाले आणि ते का? याचा अभ्यासही करण्याच्या सूचना आदित्य ठाकरे यांनी या बैठकीत दिल्या आहेत. या बैठकीत पावसाळी कामाचा आढावा घेण्यात आला.