‘मी देशाची सेवा केली, परंतु “सिस्टीम” माझा मुलगा वाचवू शकली नाही’ – कारगिल युद्ध नायक

0
323

कानपूर,दि.०१(पीसीबी) – कारगिल वीर नायक, सुभेदार मेजर (सेवानिवृत्त) हरि राम दुबे यांनी आपला ३१ वर्षीय मुलगा कोविड मुळे गमावला. एका मुलाचा मृतदेह अखेरच्या वेळी पाहण्यासाठी त्या सेवकाला कडक उन्हात तासासाठी थांबावे लागले.

कारगिल युद्धामध्ये देशासाठी लढलेल्या सुभेदार मेजर (सेवानिवृत्त) हरि राम दुबे यांचा मुलगा अमिताभ हा कानपूरच्या हॅलेट हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या उपचारासाठी दाखल होता. उपचारादरम्यान अमिताभचा मृत्यू झाला. हरी राम दुबे आणि त्यांची पत्नी, मुलगी आणि सून यांना शेवटच्या वेळी अमिताभचा मृतदेह पाहण्यासाठी तासन्तास ताटकळत उन्हानं थांबावं लागलं. कागदपत्रे मिळवण्यासाठी त्यांना इकडे-तिकडे पळण्यास सांगण्यात आले. तसेच अत्यंत अपमानस्पद वागणूक देण्यात आल्याची खंत दुबे यांनी व्यक्त केली.

“मी १९८१ ते २०११ पर्यंत मातृभूमीची सेवा केली. मला कारगिल ते बारामुल्ला ते लडाख आणि लुकुंग पर्यंत मैदानात उतरवले होते. मी कारगिलमध्ये सेवा केली आणि मी दहशतवाद्यांशी लढलो. बारामुल्लामधील दहशतवाद्यांचा मी खात्मा केला आणि कारगिलमध्ये पाकिस्तान विरुद्ध लढा दिला. माझ्या कार्याबद्दल सैन्य प्रमुखांनी प्रमाणपत्र देऊन मला सन्मानित केले. पण ‘सिस्टीम’ माझ्या मुलाला मदत करू शकली नाही आणि आता मला कागदपत्रे मिळवण्यासाठी इकडे-तिकडे पळण्यास सांगण्यात आले आहे. माझे मुलगा मेला आहे आणि आता अशी वागणूक दिली जात आहे, अशी खंत कारगिल युद्धातील नायकाने व्यक्त केली.

उत्तर भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशात कोरोनाने थैमान घातले आहे. यूपीमधील कानपूर सारख्या शहरांमध्ये सर्वाधिक परिणाम झाला आहे. शहरातील रुग्णालये कोरोना व्हायरसच्या रूग्णांनी भरली आहेत. वैद्यकीय ऑक्सिजन आणि ऑक्सिजन सिलिंडर्ससाठी संघर्ष, रेमडेसिवीर सारख्या औषधांसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची वणवण सुरु आहे. मृत रुग्णांच्या कुटूंबातील सदस्यांना त्यांच्या प्रियजनांचे मृतदेह पाहण्यासाठी तासन्तास थांबावे लागते आहे. स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी लांब रांगा. अश्या विविध कारणांनी रुग्ण व त्यांच्या नातवाईकांची परवड सुरु आहे.