‘मी दुसऱ्या बाईला घरी आणणार आहे’ म्हणत पत्नीला केली मारहाण; पुढे घडले असे काही

0
974

मोशी, दि. ९ (पीसीबी) – ‘माझे दुसऱ्या बाईशी संबंध आहेत. मी तिला घरी आणणार आहे’, असे पतीने पत्नीला सांगितले. याबाबत पत्नी पतीची समजूत घालत असताना पतीने पत्नीला बेदम मारहाण केली. ही घटना 24 एप्रिल रोजी सकाळी माझगाव चिंबळी येथे घडली.

अंजना विठ्ठल राऊत (वय 38, रा. माझगाव जय भवानी नगर, चिंबळी) असे मारहाण झालेल्या पत्नीचे नाव आहे. त्यांनी याबाबत आठ मे रोजी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती विठ्ठल भागवत राऊत (वय 45) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी 24 एप्रिल रोजी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास त्यांच्या घराच्या टेरेसवर कपडे वाळत घालत होत्या. त्यावेळी आरोपी पती विठ्ठल तिथे आला. ‘माझे दुसऱ्या बाईशी संबंध आहेत. मी तिला घरी आणणार आहे’, असे विठ्ठल याने फिर्यादी यांना सांगितले.

‘आत्ताच आपल्या मुलींची लग्ने झाली आहेत. मुलगा ही लग्नाला आलेला आहे. तुम्हाला हे शोभत नाही’, असे फिर्यादी यांनी समजावून सांगितले. त्यावर आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ करून ‘मी आणणारच आहे’ असे म्हणून लोखंडी रॉडने मारहाण केली. यात फिर्यादी जखमी झाल्या. आरोपीचा मार वाचवण्यासाठी पळून जात असताना फिर्यादी यांच्या केसाला पकडून ढकलून देत ‘तुला जिवंत ठेवणार नाही’ अशी आरोपीने धमकी दिल्याचे हे फिर्यादीत म्हटले आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.