मी त्याला कधीच माफ करणार नाही; वैशालीने परागवर व्यक्त केला संताप 

0
567

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर पडलेल्या गायिका वैशाली म्हाडेने “आता मी या घरातून बाहेर जरी आले असले तरी मी त्याला कधीच माफ करणार नाही”, अशा शब्दात आपला संताप दर्शवला आहे.  वैशालीच्या बोलण्याचा रोख थेट पराग कान्हेरेकडे होता हे बिग बॉस फॉलो करणाऱ्यांना वेगळे सांगायला नको. “बिग बॉसने मला खूप चांगले अनुभव दिले. अनेक कलाकारांशी मला स्वत:ला जोडता आले. बिग बॉस तुम्हाला फक्त दीड तास दिसत होते. पण त्या पलिकडे जवळपास २२ तास आम्ही एकत्र होतो. त्यातून अनेक चांगले अनुभव मला मिळाले. उरला प्रश्न त्या एका घटनेचा. तर त्यामुळे मात्र मला खूपच मनस्ताप सहन करावा लागला”, असेही ती म्हणाली.

यंदाच्या सीझनमध्ये वैशालीला खात्री वाटते ती शिव आणि अभिजीतबद्दल. त्या दोघांपेकी कुणीतरी एक जण बिग बॉसचा विजेता होईल असे तिला वाटते. तिला जर दोन स्पर्धकांना बाद करण्याचा अधिकार दिला तर तू ते कुणाला करशील, असं विचारताच तिने विचार करून नेहा शितोळे आणि रूपाली भोसले यांची नावे घेतली. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर ती तिच्या मुलीला भेटलीच. पण सगळ्यात मोठी गंमत झाली ती सकाळी उठताना. ती म्हणाली, “सलग दोन महिने मी सकाळी गाण्याच्या तालावर उठे. हात वर करून ती उठायची आमची एक पद्धत आहे. त्याची सवय झाली. घरी आल्यावर मला वाटले की कुठेतरी गाणे चालू आहे. मग घरातही मी तडक हात वर केला आणि क्षणभर मला कळेचना की काय चालू आहे. नंतर लक्षात आले की आपण आता घरी आलो आहे”.

मुलीच्या आठवणीने व्याकूळ झालेली वैशालीही इथे पाहायला मिळाली. ती म्हणाली, “गेल्या आठवड्यात माझ्या मुलीचा वाढदिवस होता. त्यावेळी मला तिची फार आठवण आली. कारण दर वाढदिवशी ती आजारी पडते. त्या दिवशी मी खूप एकटी होते. अभिजीत, वीणा आदींनी मला धीर दिला. पण त्या दिवशीपासून मला वाटू लागले की आता पुरे.. आता आपण या घरातून बाहेर यायला हवे. आता मी बाहेर आले याचा मला नक्कीच आनंद होतो आहे”.