मी कोणताही निर्णय घेतलेला नाही,माझं मन वळवण्याचा प्रश्नचं येत नाही – एकनाथ खडसे

0
687

नागपूर,दि.१८(पीसीबी) – भाजपाचे नेते एकनाथ खडसे आज नागपुरमध्ये आहेत. सकाळपासून माध्यमांवर एकनाथ खडसे हे शरद पवारांच्या भेटीसाठी गेले असल्याच्या बातम्या सुरू होत्या, मात्र आज आपण कोणाचीही भेट घेतली नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. शिवाय, वरिष्ठांनी माझं मन वळवण्याचा प्रश्नच येत नाही, कारण मी कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

मी नागपूरला कोणाचीहा भेट घेतलेली नाही, या सर्व अफवा आहेत. विधानभवानात माझी काही कामं असतात, मी मुख्यमंत्र्यांना भेटेल, शरद पवार आले तर त्यांना भेटेल आणि कोणी भेटायचं असेल तर त्यांना देखील भेटेल. मात्र याचा तुम्ही वेगळा अर्थ काढत आहात, कोणत्याही प्रकारे पक्ष बदलण्याचा आज विषय नाही असे ते म्हणाले.

याचबरोबर माझं मन वळवण्याचा प्रश्नचं येत नाही, कारण मी काही कोणता निर्णय घेतलेला नाही. जर निर्णय घेतला असता तर वरिष्ठांना मन वळवण्याचा प्रसंग आला असता. परंतु, माझा वरिष्ठांशी कायम संपर्क असतो. मात्र असा कोणताही विषय नसल्याने वरिष्ठांनी माझं मन वळवण्याचा आजतरी संबंध नाही, असे खडसे यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केले.