Desh

मी किती त्रास सहन करीत आहे, सांगू शकत नाही- कुमारस्वामी

By PCB Author

June 20, 2019

बंगळुरू, दि. २० (पीसीबी) – सध्या मी किती त्रास सहन करीत आहे, हे सांगू शकत नाही. धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) आणि काँग्रेस आघाडी सरकार चालविताना मला तारेवरची कसरत करावी लागत आहे. जनतेचे दु:ख समजून घेणे, त्यांना या दु:खातून बाहेर काढणे ही माझी जबाबदारी आहे. राज्य सरकार सुरळीपणे चालविणे हीही माझीच जबाबदारी आहे. मात्र, असे होत नाही,’ असे सांगत कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी भर सभेत पुन्हा एकदा भावूक झाले. बुधवारी चन्नपटना येथे आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी ही व्यथा जनतेसमोर मांडली.

लोकसभा निवडणुकीत ‘जेडीएस’-काँग्रेस आघाडीला सपाटून मार खावा लागला होता. तसेच, सरकार स्थापनेपासून आघाडीतील दोन्ही पक्षांत सुरू असलेल्या कुरबुरी, भाजपकडून ‘ऑपरेशन कमळ’ची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर कुमारस्वामी यांनी आपली व्यथा मांडली. यापूर्वीही कुमारस्वामी यांनी भावूक होत ‘आपण भगवान शंकराप्रमाणे आघाडीचे विष पितोय, कोणत्याही क्षणी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊ शकतो,’ असे म्हटले होते.

‘मला रोज किती त्रासाला सामोरे जावे लागत आहे, हे मी सांगू शकत नाही. परंतु, मला माझे दु:ख तुम्हाला सांगण्याऐवजी तुमचे दु:ख ऐकून घ्यायचे आहे. ते दूर करायचे आहे. राज्य सरकार सुरळीतपणे चालवायचे आहे. परंतु, तेच होत नाही. तरीही मी तुमच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याचे आश्वासन देतो,’ असे कुमारस्वामी म्हणाले. तसेच, ‘भाजपकडून आमच्या सहकारी आमदारांना फोडण्याचे काम सुरू आहे. विधानसभेतील माझ्या एका सहकाऱ्याला भाजपकडून फोन आला होता. ‘जेडीएस’ सोडण्यासाठी दहा कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली. भाजपकडून वारंवार असा प्रकार करण्यात येत आहे. परंतु, भाजपने सरकार पाडण्याचे कितीही प्रयत्न केले, तरी देवाच्या कृपेने आणि तुमच्या आशीर्वादाने हे सरकार उर्वरित चार वर्षांचा कार्यकाळही पूर्ण करेल,’ असा विश्वास कुमारस्वामी यांनी व्यक्त केला.