Maharashtra

मी कर्तव्याने, निष्ठेने हिंदू आहे आणि हिंदू म्हणूनच मरणार – जितेंद्र आव्हाड

By PCB Author

April 05, 2020

 

मुंबई, दि.५ (पुसीबी) – “काल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयावर भाष्य केले होते. त्यानंतर अनेकांनी माझ्यावर टीका केली. तर काहींनी माझ्या वक्तव्याला पाठिंबाही दिला. अनेकांनी मला तू मुसलमान का होत नाहीस, तबलिगींमध्ये सामिल का होत नाही, अशी विचारणा केली. मी कर्तव्याने, निष्ठेने हिंदू आहे आणि हिंदू म्हणूनच मरणार. मी कोणाला विचारून माझी ध्येयधोरणं ठरवत नाही. मी स्वत:ला विक्रीसाठी उपलब्ध करत नाही. मी दलालाचीच्या धंद्यातही नाही आणि सरकार बदलल्यावर आपली निष्ठा विकणाऱ्यांपैकीही मी नाही,” असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना उत्तर दिले. त्यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे.

“मी उपाशी मरेन पण निष्ठा विकणार नाही. मशिदींना लॉक लावले पाहिजे, याचा निर्णय सर्वप्रथम मुंब्र्यात झाला. हिंदू आणि मुस्लीम वस्त्यांमध्ये लोकांनी शिस्तीने वागावे हे सांगण्याची हिंमत मी दाखवली. यात प्रश्न मानवतेचा आहे. माणूस मरत असताना जर आपण धर्माचा विचार करत असू तर हा माणुसकीचा अपमान आहे. करोना हा तुमची माणुसकी जागी करण्यासाठी आला आणि काहींनी माणुसकीशीच खेळण्यास सुरूवात केल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्रात आम्ही त्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली. पण दिल्लीत त्या कार्यक्रमाला परवानगी देण्याचं काम केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी का केलं? त्यांच्या पोलिसांनी ती परवानगी का दिली?,” असा सवालही त्यांनी केला.

“मी आपल्या कामाच्या जोरावर मतदारसंघात निवडणुकीत आघाडी घेतली. मी कोणाच्या घरी चकरा मारत फिरत नाही. मी रोज या ठिकाणी काम करत आहे. रोज जवळपास ८० हजार लोकांना जेवू घालतो. कळव्यात आम्ही सुरू केलेल्या रूग्णालयांसारखे उपचार कोणीही देऊ शकत नाही. मला उपदेश देणाऱ्यांनी आपलं धर्म आचरण करा,” असंही त्यांनी सांगितले. “जिथे जिथे अत्याचार होई, त्या ठिकाणी मी त्याविरोधात आवाज उचलेन. जीव गेला तरी चालेल पण तत्त्वांशी तडजोड करणार नाही,” असंही त्यांनी स्पष्ट केले.