मी ओबीसी आहे म्हणून सतत मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जात आहे – विजय वडेट्टीवार

0
302

मुंबई,दि.६(पीसीबी) – मी ओबीसी समाजातून आलेलो आहे म्हणून सतत मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जात आहे असं वाटत असल्याने, मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सारथीची जबाबदारी मराठा मंत्र्याकडे देण्याची विनंती करणार आहे, असं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

मराठा क्रांती मोर्चाने विजय वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिलीये. ते ‘टीव्ही 9 मराठी’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते. सारथी संस्था बंद पडणार नाही हे मी आजही छातीठोकपणे सांगतो. पण यामागे राजकीय मंडळी या मंडळींना चिथावणी देत आहेत, त्यांची नावं योग्यवेळी जाहीर करेन, असंही यावेळी विजय वडेट्टीवार म्हणाले.

दरम्यान, मी प्रामाणिकपणे काम करतोय. पण तरीही तुमचे आरोप झाल्यानंतर मला त्यामध्ये काम करण्यात रस नाही. आमच्या सरकारला केवळ 6 महिने झाले आहेत. मात्र चार महिन्यांपेक्षा जास्त काळ कोरोनामध्ये गेले. सर्वांना माहिती आहे की आर्थिक परिस्थिती बिकट आहे. निधीचा तुटवडा आहे. पण हा निधी मागे-पुढे होईल, मात्र सारथी बंद पाडणार नाही, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.