मी एक दिवसाचा मुख्यमंत्री होतो, तुम्ही एक दिवसाचा शेतकरी होऊन दाखवा – शेतकरीराजा

0
537

मुंबई, दि.४ (पीसीबी) – विधानसभा निवडणूक युतीमध्ये लढवलेले शिवसेना आणि भाजप यांच्यात मुख्यमंत्रीपदाविषयी वाद सुरु आहे. शिवसेनाला सत्तेत अर्धा हिस्सा पाहिजे तर भाजप समसमान वाटप करण्यास तयार नाही. दोनही पक्षाचे नेते यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

दुसरीकडे राज्यात पडलेल्या पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी सध्या अडचणीत आहे. राजकीय नेते सध्या सत्ता स्थापनेत व्यस्त आहेत त्यामुळे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शेतकरी नेत्यांकडून संताप व्यक्त होत आहे. आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याने राग व्यक्त करत मुख्यमंत्र्यांना चॅलेंज दिले आहे.

बालाजी शिनगारे या शेतकऱ्याने राज्यकर्त्यांचा सत्तास्थापनेचा घोळ मिटेना, तर हे शेतकऱ्याकडं कधी बघणार आहेत. त्यांचं फक्त खुर्चीसाठी भांडण सुरू आहे. मुख्यमंत्री माझा की तुझा हेच भांडण सुरू आहे. तुम्ही शेती करुन बघा. मी एक दिवसाचा मुख्यमंत्री होतो, तुम्ही एक दिवसाचा शेतकरी होऊन दाखवा. मग तुम्हाला कळेल शेतकऱ्याच्या काय वेदना असतात. जर तुम्ही एक दिवस शेतकरी होऊन दाखवलं तर तुमची पाठ थोपटवतो असं विधान केले आहे.

दरम्यान, शिंगरे यांनी शेतकऱ्याची स्थिती अत्यंत खराब आहे. हे शेतकऱ्याच्या विरोधातील सरकार आहे. शेतकरी मरायला लागला आहे.शेती अजिबात परवडेनासी झाली आहे. कांदा सडका असतो हे ऐकले होते, पण सरकार पण सडकंच आहे हे माहिती नव्हते अशा शब्दात त्यांनी सरकारवर रोष व्यक्त केला आहे.