“मी इथला डॉन आहे” असं म्हणत भाईने लुटले लॉटरीचे दुकान; पोलिसांना कळताच…

0
275

चिखली,दि.०४(पीसीबी) – लॉटरीच्या दुकानासमोर येऊन कोयत्याचा धाक दाखवून लोकांना मारहाण केली. त्यानंतर लॉटरीच्या दुकानात येऊन कोयत्याचा धाक दाखवत लॉटरी दुकानातून रोकड काढून घेतली. त्यानंतर ‘मी इथला डॉन आहे. मी आलो की मला पैसे द्यायचे, नाहीतर मारून टाकीन’ अशी धमकी दिली. ही घटना शनिवारी (दि. २) रात्री सात वाजता साने चौक, मोरेवस्ती येथे बालाजी लॉटरी सेंटर या दुकानात घडली. या स्वयंघोषित 22 वर्षीय भाईला चिखली पोलिसांनी अटक केली आहे.

दिनेश मनोहर खरात (वय 22, रा. नेवाळे वस्ती, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत विशाल उद्धव गडकर (वय 22, रा. ताम्हाणे वस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री सात वाजता आरोपी हातात कोयता घेऊन फिर्यादी यांच्या लॉटरीच्या दुकानासमोर आला. दुकानासमोरील कुल्फीच्या गाडीजवळ येऊन त्याने लोकांना शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर तो लॉटरीच्या दुकानात आला. त्याने ‘ए चल पैसे दे. नाहीतर एकेकाला मारून टाकीन’ अशी धमकी दिली.

जीवे मारण्याची धमकी देत आरोपीने दुकानातील काउंटरमधून दोन हजार 300 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. ‘तुमच्या मालकाला पण सांगा. मी आलो की मला पैसे द्यायचे. नाहीतर तुमच्या मालकाला पण मारून टाकील’ अशी धमकी देत आरोपीने फिर्यादी आणि त्यांच्या सोबतच्या कामगारांना मारहाण केली.

‘मी इथला डॉन आहे. पोलिसात तक्रार दिली तर तुमचे हात-पाय तोडीन’ अशी धमकी आरोपीने दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत